'साधू-संतांचा अपमान केल्यास तुरुंगात जावं लागेल'; सुवेंदू अधिकारी यांचा इशारा, म्हणाले- 'टिळा, शेंडी, धोतर
कोलकात्यातील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये गीता पठण कार्यक्रमात पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी साधू-संतांचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात जावं लागेल असा इशारा दिला.
साधू-संत आणि ऋषीमुनींचा अपमान करणाऱ्यांना यापुढे तुरुंगात जावं लागेल, असा स्पष्ट इशारा पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे. कोलकात्यातील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये रविवारी ११ हजार लोकांच्या उपस्थितीत गीता पठणाचा कार्यक्रम पार पडला, त्यावेळी अधिकारी यांनी हे वक्तव्य केलं. याच कार्यक्रमात त्यांनी गीता पठण, हनुमान चालिसा आणि इतर धार्मिक उपक्रमांबाबतही आपल्या सरकारची भूमिका मांडली.
'साधू-संत-महंतांचा अपमान केला तर तुरुंगात जावं लागेल', असं अधिकारी स्पष्टपणे म्हणाले. यामागचं कारणही तसंच आहे. दुर्गापूजेच्या काळात मांसाहारावर वक्तव्य केल्यानं बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावरून बंगालमध्ये आधीच वाद पेटला होता. या वादानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे फोटो जाळण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना घडल्यानंतर संबंधितांवर कारवाईचे निर्देश सुवेंदू अधिकारी यांनी दिल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणात काँग्रेसचे कोलकाता पदाधिकारी अतनू दास यांना अटकही करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर नेताजी इनडोअर स्टेडियममधल्या कार्यक्रमात अधिकारी यांनी सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. 'आता काळ बदलला आहे, कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही', असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. गीता वाचा, हनुमान चालिसेचं पठण करा, हरे कृष्ण मंत्राचा जप करा आणि शंख वाजवा, असं आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थितांना केलं.
आपल्या सरकारचं वर्णन करताना अधिकारी यांनी 'टिळा, शेंडी, धोतर आणि तुळशीचं सरकार' असे शब्द वापरले. गोमातेचं संरक्षण करण्यासाठीच आपलं सरकार काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. धार्मिक श्रद्धा उघडपणे व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, हाच त्यांच्या बोलण्याचा गाभा होता.
दरम्यान, येत्या २९ डिसेंबरला कोलकात्यात १० लाख लोकांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणावर गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा याच कार्यक्रमात करण्यात आली. या मोठ्या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहण्याची शक्यता असल्याचं अधिकारी यांनी सांगितलं.
धीरेंद्र शास्त्री यांचे फोटो जाळण्यात आल्याच्या घटनेचा उल्लेख करत, यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अधिकारी यांनी पुन्हा एकदा दिला. या संपूर्ण भाषणात त्यांनी आपल्या सरकारची धार्मिक आणि सांस्कृतिक भूमिका स्पष्टपणे मांडली, तसंच विरोधकांवरही टीका केली.