मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:33 IST

रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकावी, १८ ऑगस्ट २०२७ नंतर सवलत नाही: सरनाईक

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी चालकांना मराठी शिकण्याचे आवाहन केले असून, स्थगितीचा काळ तयारीसाठी वापरण्यास सांगितले आहे.

रिक्षा-टॅक्सी चालकांनी मराठी शिकावी, १८ ऑगस्ट २०२७ नंतर सवलत नाही: सरनाईक
एआई से बनाई गई प्रतीकात्मक तस्वीर; यह घटना का वास्तविक फोटो नहीं है | PT24

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर इथल्या लोकांशी बोलण्यासाठी मराठी शिकणे ही फक्त अपेक्षा नाही, तर सामाजिक जबाबदारी आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. राज्यात रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित प्रवासी वाहने चालवणाऱ्या अमराठी भाषिक चालकांनी स्थगितीचा आधार घेऊन मराठी शिकण्याकडे दुर्लक्ष करू नये, असे ते म्हणाले. 'महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!' या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सहभागी होऊन सर्व अमराठी चालकांनी व्यावहारिक मराठी आत्मसात करावी, असे आवाहन सरनाईक यांनी केले.

महाराष्ट्रात राहून आणि व्यवसाय करून रोज इथल्या नागरिकांशी व्यवहार करणाऱ्या प्रत्येक चालकाला प्रवाशांशी आत्मविश्वासाने मराठीत बोलता यावे, यासाठी हे अभियान राबवले जात आहे. परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियान' सुरू आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यभरात १८० पेक्षा अधिक ठिकाणी शाखा सुरू करण्यात आल्या. सुमारे १,८०० शिक्षकांच्या मदतीने १ लाख ६५ हजार ८०० हून अधिक अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरीही राज्यात सुमारे ८ ते ९ लाख अमराठी चालक रिक्षा, टॅक्सी आणि ॲपआधारित वाहने चालवत आहेत. उरलेल्या चालकांपर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा टप्पा सुरू केला आहे.

मर्यादित वेळेत इतक्या मोठ्या संख्येने अमराठी चालकांना व्यवहारिक मराठी शिकवणे हे मोठे आव्हान आहे. म्हणून ज्या चालकांनी अजून मराठी शिकलेली नाही, त्यांनी लगेच प्रशिक्षण वर्गात नाव नोंदवावे किंवा ऑनलाईन पद्धतीने मराठी शिकावी, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

दरम्यान, व्यवहारिक मराठीबाबतच्या सुधारित कायद्याच्या अंमलबजावणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या मागणीनुसार १८ ऑगस्ट २०२७ पर्यंत स्थगिती दिली आहे. ही स्थगिती म्हणजे कायदा रद्द झालेला नाही, हे अमराठी चालकांनी लक्षात घ्यावे, असे सरनाईक म्हणाले. या काळाचा उपयोग मराठी शिकण्यासाठी करावा, असेही ते म्हणाले. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यावर कोणतीही सबब किंवा मुदतवाढ मिळेलच, असे गृहीत धरू नये, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

"मराठी शिकण्यासाठी सरकारने प्रशिक्षणाची दारे खुली केली आहेत. स्थगिती ही मराठी शिकण्यापासून पळ काढण्याची संधी नाही, तर स्वतःला तयार करण्यासाठी मिळालेली मुदत आहे. या मुदतीत व्यावहारिक मराठी शिकून घ्या. १८ ऑगस्ट २०२७ नंतर कायद्याची अंमलबजावणी करताना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल," असा सज्जड इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि सामाजिक सलोखा जपणे, तसेच प्रवासी आणि चालक यांच्यातील संवाद सोपा व्हावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. "आज मराठी शिका, उद्याची कारवाई टाळा", असा स्पष्ट संदेश देत अमराठी चालकांनी दुसऱ्या टप्प्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ