रेट्रो फोटोच्या नादात APK लिंकमधून सायबर भामट्यांचा मोबाईल, बँकिंग डेटावर डल्ला
रेट्रो लूकच्या फोटोंच्या ट्रेंडचा गैरफायदा घेत सायबर भामटे WhatsApp आणि SMS वरून बनावट APK लिंक पाठवत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
सोशल मीडियावर सध्या जुन्या आठवणी जागवणाऱ्या रेट्रो फोटोंची क्रेझ प्रचंड वाढली आहे. ८०च्या दशकातील लूकमध्ये स्वतःचे किंवा घरातल्या माणसांचे फोटो बनवण्याचा ट्रेंड लोकांमध्ये लोकप्रिय होतोय. पण नेमक्या याच ट्रेंडचा फायदा घेत सायबर भामट्यांनी फसवणुकीची नवी शक्कल लढवल्याचं समोर आलं आहे. रेट्रो स्टाईलमध्ये फोटो बनवून देतो असं सांगत हे भामटे WhatsApp आणि SMS वरून युजर्सना बनावट लिंक पाठवत असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या लिंकवर क्लिक केलं की फोटो तयार करण्यासाठी एखादं एडिटिंग किंवा AI ॲप डाउनलोड करायला सांगितलं जातं. बऱ्याचदा यासाठी APK फाइल डाउनलोड करायला भाग पाडलं जातं. पण अनोळखी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करून ॲप इन्स्टॉल केलं, तर मोबाईलच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे.
हे बनावट ॲप एकदा मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालं की ते SMS, नोटिफिकेशन्स, कॉन्टॅक्ट्स, डिव्हाइसची माहिती आणि इतर सेन्सिटिव्ह डेटासाठी परवानग्या मागू शकतं. युजरने या परवानग्या दिल्या, तर OTP किंवा बँकिंगशी संबंधित माहिती परस्पर ॲक्सेस होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे केवळ एक आकर्षक फोटो मिळवण्यासाठी अनोळखी ॲपला गरजेपेक्षा जास्त परवानग्या देऊ नयेत, असा सल्ला दिला जातोय.
ही फसवणूक फक्त मोबाईल किंवा बँकिंग माहितीपुरती मर्यादित नाही. युजर्सकडून मिळवलेल्या चांगल्या दर्जाच्या चेहऱ्याच्या फोटोंचाही गैरवापर होण्याची शक्यता आहे. अशा फोटोंच्या आधारे बनावट सोशल मीडिया प्रोफाइल किंवा डीपफेक बनवले जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी ॲप किंवा वेबसाइटवर स्वतःचा फोटो अपलोड करण्याआधी तो किती विश्वासार्ह आहे, हे तपासणं गरजेचं आहे.
अशी फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. WhatsApp किंवा SMS वरून आलेल्या अनोळखी फोटो-एडिटिंग किंवा AI ॲपच्या लिंकवर क्लिक करू नये. अनोळखी वेबसाइटवरून APK फाइल डाउनलोड करू नये. कोणतंही AI किंवा फोटो-एडिटिंग ॲप इन्स्टॉल करण्याआधी त्याचा डेव्हलपर कोण आहे, रिव्ह्यू काय आहेत आणि ते कोणत्या परवानग्या मागतंय, हे तपासावं. एखादं ॲप गरजेपेक्षा जास्त परवानग्या मागत असेल, तर ते इन्स्टॉल करणं टाळावं. आधीच असं संशयास्पद ॲप इन्स्टॉल केलं असेल, तर ते लगेच अनइन्स्टॉल करावं. तसंच अशा ॲपच्या वापरानंतर बँक खात्यातील व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या खात्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.
सायबर फसवणूक झाल्याचं लक्षात आलं, तर वेळ न घालवता १९३० या सायबर क्राइम हेल्पलाइनवर संपर्क साधावा. तसंच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवरही तक्रार नोंदवता येते. रेट्रो फोटोचा ट्रेंड कितीही आकर्षक वाटत असला, तरी अनोळखी लिंक, APK फाइल आणि संशयास्पद ॲपपासून सावध राहणं गरजेचं आहे. ट्रेंड फॉलो करण्यापेक्षा डिजिटल सुरक्षिततेला प्राधान्य देणं जास्त महत्त्वाचं आहे.