'Rent a Garba Partner' अॅपच्या चौकशीची मागणी, आमदार मेहतांचे पोलीस आयुक्तांना निवेदन
मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी सोशल मीडियावर सुरू असलेल्या गरबा पार्टनर सेवेच्या जाहिरातींची चौकशी करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली.
मीरा-भाईंदरसह मुंबई उपनगर आणि ठाणे परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त गरबा आणि दांडिया कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरू असतानाच, सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या एका अॅपमुळे नवा वाद उभा राहिला आहे. 'Rent a Garba Partner' या नावाने कथितरित्या सुरू असलेल्या या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केली आहे. यासाठी मेहता यांनी पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
आमदार मेहता यांनी दिलेल्या निवेदनानुसार, फेसबुक, व्हाट्सऐप, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर 'Rent a Garba Partner' या नावाखाली महिला, पुरुष, तरुण आणि तरुणींना गरबा पार्टनर म्हणून उपलब्ध करून दिले जात असल्याच्या जाहिराती फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या जाहिरातींमध्ये १ हजार रुपयांपासून ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचा दावा कथितरित्या करण्यात आला आहे.
या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत अॅप चालवणारे, त्याची जाहिरात करणारे तसेच या माध्यमातून सेवा पुरवण्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी मेहता यांनी केली आहे. या प्रकारातून विशेषतः महिला आणि नवतरुणींची फसवणूक होण्याची तसेच त्यांची वैयक्तिक माहिती गैरवापर होण्याची किंवा ती उघड होण्याची शक्यता असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. अशा प्लॅटफॉर्मवरून कोणताही गैरप्रकार घडत असेल, तर तो तातडीने रोखण्याची गरज असल्याचे मेहता यांनी निवेदनात नमूद केले आहे.
'Rent a Garba Partner' या अॅपमधून नेमकी कोणती सेवा दिली जाते, त्यासाठी नोंदणी कशी केली जाते, ग्राहकांकडून कोणती माहिती घेतली जाते आणि सोशल मीडियावरील जाहिरातींचे स्वरूप नेमके काय आहे, याची तपासणी करण्याची मागणी मेहता यांनी केली आहे. याशिवाय अॅपच्या मालकांसोबतच त्याची जाहिरात करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांचीही चौकशी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यात अशा प्रकारचे अॅप तयार करून किंवा त्याची जाहिरात करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही त्यांनी नोंदवली.
दरम्यान, या संदर्भात पोलिसांनी विशेषतः महिला आणि नवतरुणींमध्ये जनजागृती करावी, अशी विनंतीही आमदार नरेंद्र मेहता यांनी केली आहे. अशा जाहिरातींना भुलून वैयक्तिक माहिती, फोटो, मोबाईल क्रमांक किंवा आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.