रवी जाधव-झी स्टुडिओजचा नवा सिनेमा 'फुलवरा' 14 जानेवारी 2027ला प्रदर्शित होणार
'नटरंग'नंतर 16 वर्षांनी रवी जाधव पुन्हा तमाशा आणि लावणीच्या विषयावर सिनेमा घेऊन येत आहेत, नाव आहे 'फुलवरा'.
लावणी म्हटलं की डोळ्यासमोर घुंगरूचा आवाज, ढोलकीचा ठेका आणि अस्सल मराठी मातीचा सुगंध येतो. 16 वर्षांपूर्वी आलेल्या 'नटरंग' सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं आणि गुणा आणि त्याची लावणी आजही लोक विसरले नाहीत. आता तब्बल 16 वर्षांनंतर तीच जोडी म्हणजे झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा लावणीवर सिनेमा घेऊन येत आहेत. या नव्या सिनेमाचं नाव आहे 'फुलवरा'.
सिनेमाच्या टीमने आता प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'फुलवरा' हा सिनेमा मकर संक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारी 2027ला थिएटरमध्ये येणार आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या घोषणेसोबत एक पोस्टरही रिलीज झालं आहे. पोस्टरमध्ये पूजेचं ताट आहे आणि त्यात देवी अंबाबाईचा मुखवटा दाखवला आहे. त्याखाली एक ओळ लिहिली आहे, 'आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या आणि अस्सल मराठी लावणीला बळ द्या'. या एका ओळीतच सिनेमाचा विषय स्पष्ट होतो. सिनेमा अस्सल मराठी लावणीवर बेतलेला असणार आहे. मात्र कथा नेमकी काय आहे आणि कलाकार कोण आहेत, हे अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे.
'द फोक आख्यान' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या हर्ष-विजय या जोडीने या सिनेमाला संगीत दिलं आहे. आजकाल ही जोडी लोकसंगीतात खूप गाजतेय आणि लोककलेवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद आणि गाणी 'द फोक आख्यान'चेच लेखक ईश्वर ताराबाई अंधारे यांनी लिहिली आहेत. एकीकडे लोककलेचा अभ्यास असणारी नवीन पिढी आणि दुसरीकडे रवी जाधव यांचा मोठा अनुभव, यांचा संगम या सिनेमात बघायला मिळणार आहे. हा सिनेमा फक्त लावणीचा डान्स दाखवणार नाही तर त्या मागची संस्कृती, परंपरा आणि आजच्या काळात लावणी कशी बदलत गेली हे पण दाखवणार आहे असं बोललं जातंय.
या सिनेमाबद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, "'नटरंग'नंतर 16 वर्षांनी परत तमाशावर सिनेमा करणं हे खरंच धाडस आहे. कारण तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेचा जीव आहे आणि लावणी ही त्या लोककलेची राणी आहे. अशा मोठ्या परंपरेवर सिनेमा करणं ही मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी समजून आम्ही 'फुलवरा' बनवला आहे." ते पुढे म्हणाले, "'नटरंग'ची गोष्ट 70च्या दशकातली होती, तर 'फुलवरा'ची गोष्ट 2015मधली आहे. या 50-55 वर्षांत तमाशा खूप बदलला. पण आजही तमाशा कलावंत आपली अस्सल मराठी कला जपण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी त्यांचा संघर्ष आणि त्याग खूप मोठा आहे. आमच्या या फुलवऱ्याला लोक 'नटरंग'सारखंच प्रेम देतील अशी आशा आहे."
झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणाले, "झी स्टुडिओज, रवी जाधव आणि लावणी, हे समीकरण पुन्हा एकदा येतंय याचा आम्हाला खूप आनंद आहे. कथा ऐकल्यापासूनच आम्हाला या सिनेमाबद्दल उत्सुकता होती. नवीन वर्षाची सुरुवात 'फुलवरा'ने चांगली होईल याची खात्री आहे. प्रेक्षकांना अस्सल लावणीचा बाज बघायला मिळेल." तर 14 जानेवारी 2027ला 'फुलवरा' थिएटरमध्ये येतोय आणि 'नटरंग'ने जो ठसा उमटवला होता, तोच ठसा 'फुलवरा' उमटवतो का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे.