गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

रामटेक तालुक्यात वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला, दोन्ही हातांवर वार; आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात

रामटेक तालुक्यात वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला, दोन्ही हातांवर वार; आरोपी तासाभरात पोलिसांच्या ताब्यात छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

सागवानाचे लाकूड नेणाऱ्याला थांबवून विचारणा केल्याने संतापलेल्या आरोपीने वनमजूर एकनाथ भोयर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे. भोयर गंभीर जखमी असून नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एका वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जंगलातून सागवानाचे लाकूड घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला थांबवून विचारणा केल्यामुळे संतापलेल्या आरोपीने वनमजुरावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात वनमजूर एकनाथ भोयर यांच्या दोन्ही हातांवर कुऱ्हाडीचे घाव लागले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना रामटेक तालुक्यातील सत्रापूर शिवारात बुधवारी, २८ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोरडा येथील रहिवासी प्रकाश जयपत परतेती हे सायकलवरून सागवानाचे लाकूड घेऊन जात असल्याचे वनमजूर एकनाथ भोयर यांच्या निदर्शनास आले. भोयर यांनी त्यांना थांबवले आणि हे लाकूड कुठून आणले, अशी विचारणा केली.

भोयर घटनेचे छायाचित्र घेत असताना संबंधित व्यक्ती संतापली आणि तिने भोयर यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची माहिती आहे. आरोपीच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी भोयर यांनी दोन्ही हात वर केले. मात्र, त्या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांवर कुऱ्हाडीचे घाव लागले आणि ते गंभीर जखमी झाले.

जखमी भोयर यांना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच रामटेकचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे तातडीने घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे, पारशिवणी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डोणेकर, पोलीस हवालदार संदीप नागोसे आणि हरीश यंगलवार यांनी गावकऱ्यांच्या मदतीने कारवाई केली. त्यानंतर घटना घडल्यापासून एका तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.

आरोपीकडून हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कुऱ्हाड आणि सायकल जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पारशिवणी पोलीस आणि वनविभाग करत आहेत.

जंगलातील लाकूडचोरी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वनमजुरावरच कुऱ्हाडीने हल्ला झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जंगलाच्या संपत्तीचे रक्षण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ