राजुऱ्यात सीमेवरच्या जुगार क्लबवर पोलिसांची धाड, 150 जण ताब्यात, 50 लाख जप्त
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील सोनुर्ली-लकडकोट भागातील क्लबमध्ये रविवारी मोठा जुगार डाव सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकला.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर असलेल्या सोनुर्ली-लकडकोट परिसरात रविवारी पोलिसांनी एका वादग्रस्त क्लबवर अचानक धाड टाकली. मनोरंजनाच्या नावाखाली या क्लबमध्ये मोठ्या पातळीवर जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती, त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
धाडीत पोलिसांनी घटनास्थळावरून जवळपास 50 लाख रुपयांची रोकड आणि जुगारासाठी वापरलं जाणारं साहित्य जप्त केल्याची प्राथमिक माहिती आहे. या कारवाईत तब्बल 150 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचीही चर्चा आहे. सीमावर्ती भागात सुरू असलेल्या या 'क्लब सिंडिकेट'ला पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोठा हादरा बसला आहे.
हा परिसर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या अगदी सीमेवर येत असल्यामुळे दोन्ही राज्यांतल्या मोठमोठ्या जुगाऱ्यांसाठी हा क्लब एक सुरक्षित अड्डा बनला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी या क्लबमध्ये तेलंगणाकडून मोठ्या संख्येने पैसेवाले खेळाडू आले होते. पोलिसांचं पथक अचानक क्लबमध्ये पोहोचताच आतमध्ये जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच गोंधळ आणि पळापळ उडाली. बंद दारांआड टेबलांवर लाखो रुपयांच्या नोटांचे बंडल आणि पत्ते पसरलेले असतानाच पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला.
कारवाईच्या वेळी क्लबमध्ये साधारण साडेचारशे ते पाचशे लोकांची गर्दी होती, त्यापैकी सुमारे 150 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातले नेमके किती खेळाडू आणि किती क्लबचे कर्मचारी आहेत, तसंच कोणावर कोणते गुन्हे नोंदवले जाणार आहेत, याची पडताळणी पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. जप्त केलेली रोकड मोजण्याचं काम आणि जप्तीचा पंचनामा करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
राजुरा उपविभागाची जबाबदारी सांभाळणारे आणि धडक कारवाईसाठी ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी कुमार सुशांत (SDPO) यांच्या कार्यकाळात सीमावर्ती भागातल्या अवैध धंद्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केलं आहे. याआधी राजुऱ्यातल्या गाजलेल्या पापा जाधव हत्या प्रकरणात संघटित गुन्हेगारी मोडून काढत मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता सीमाभागातल्या जुगार अड्ड्यावर झालेली ही मोठी कारवाई अवैध धंदे चालवणाऱ्यांना थेट इशारा मानली जात आहे.
या कारवाईनंतर स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. हा क्लब नेमका कोणत्या परवान्यावर चालवला जात होता, मनोरंजन किंवा खेळांच्या नावाखाली मिळालेल्या परवान्याचा गैरवापर करून इथे कॅसिनोसारखा अवैध जुगार अड्डा कोण चालवत होतं आणि या रॅकेटमागे सीमेपलीकडचे कोणाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत, हे प्रश्न विचारले जात आहेत.
स्थानिक नागरिकांच्या मते ही कारवाई फक्त एका दिवसाच्या छाप्यापुरती मर्यादित न राहता क्लबचे संचालक, त्याला पैसा पुरवणारे आणि स्थानिक पातळीवर पाठबळ देणाऱ्यांचं संपूर्ण नेटवर्क उघड करणं गरजेचं आहे. जप्त केलेली रोकड, जुगाराचं साहित्य आणि नोंदवले जाणारे गुन्हे याबाबतचे अधिकृत तपशील पोलीस प्रशासनाकडून प्रसिद्धीपत्रक आल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत. तरीही सोनुर्लीतल्या या छाप्यामुळे सीमावर्ती भागातली 'क्लब संस्कृती' उघड झाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.