राजुरात २८ सप्टेंबरला काँग्रेसतर्फे जन आक्रोश मोर्चा, धोटे यांच्या नेतृत्वात आंदोलन
शेतकरी, महिला, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने राजुरात मोर्चा आयोजित केला आहे.
राजुरा विधानसभा काँग्रेसतर्फे राजुरात २८ सप्टेंबर २०२६ रोजी जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. सकाळी १० वाजता भवानी माता मंदिरापासून मोर्चाला सुरुवात होईल आणि तिथून तो तहसील कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, विरोधी पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधणे हा या मोर्चाचा उद्देश असल्याचे काँग्रेसतर्फे सांगण्यात आले.
मोर्चातून काँग्रेसने अनेक मागण्या मांडल्या आहेत. संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई आणि कर्जमाफी द्यावी, शेतमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, खते आणि बियाण्यांचा काळाबाजार थांबवावा, तसेच सातबारा आणि फार्मर आयडीचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा द्यावा आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर होणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.
लाडकी बहीण पोर्टल सुरू करून योजनेतील महिलांना न्याय द्यावा आणि नवीन नोंदणी सुरू करावी, महिलांना एनसीएमसी कार्डाची सक्ती नको, निराधारांना दरमहा नियमित आर्थिक मदत मिळावी, अशाही मागण्या मोर्चातून करण्यात येणार आहेत. यासोबतच ग्रामीण आणि शहरी भागातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, घरकुल आणि सामाजिक सुरक्षा योजनांचे प्रलंबित लाभ तातडीने द्यावेत, पेपरफुटी रोखावी, स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्यावा आणि गॅस, पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीपासून दिलासा द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
जातनिहाय जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद करावी आणि ओबीसी, एससी व एसटी समाजाचा निधी अन्य कामांसाठी खर्च करू नये, अशीही मागणी काँग्रेसने केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून तातडीने दूर करून त्यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी, तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरबदलाची स्वतंत्र समीक्षा करावी, यासाठीही हा मोर्चा काढण्यात येत आहे.
या सर्व जनहिताच्या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या जन आक्रोश मोर्चात शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजुरा विधानसभा काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.