गांधी जयंतीला देशभर आंदोलन; ज्ञानेश कुमार जाणार, असे राहुल गांधी म्हणाले
मतदार याद्या आणि SIR विरोधात शुक्रवारी देशभर आंदोलन झाले. आंदोलकांना मारहाण होत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी 'वोट चोरी'चा उल्लेख करत पुन्हा एकदा मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. रस्त्यांवर तरुणांना मारहाण होत आहे, असा आरोप त्यांनी केला.
राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी गांधी जयंतीच्या दिवशी हजारो तरुण वोट चोरीच्या विरोधात रस्त्यावर उतरले. हे आंदोलन शांततेत झाले, कोणतीही हिंसा झाली नाही आणि तरुणांनी संविधानाने दिलेल्या अधिकारांचा वापर केला, असे ते म्हणाले.
लोकशाही वाचवा आणि ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी या तरुणांची मागणी आहे, असे गांधी यांनी सांगितले. मोदी-शहा सरकार यावर काय उत्तर देणार, असा सवाल त्यांनी केला. तरुण-तरुणींना रस्त्यावरून फरफटत नेले जात आहे आणि शेकडो जणांना ताब्यात घेतले आहे, असा आरोपही त्यांनी केला. फक्त वोट चोरीबद्दल प्रश्न विचारणे ही त्यांची चूक आहे का, असेही ते म्हणाले.
गांधी पुढे म्हणाले की, सत्य बोला आणि शांततेत लढा द्या, अशी बापूंची शिकवण होती आणि सरकारला सर्वात जास्त भीती त्याचीच वाटते. लाठ्या-काठ्यांनी जमाव पांगवता येतो, पण प्रश्न पांगवता येत नाही, असे ते म्हणाले. ज्ञानेश कुमार जाणार आणि ज्या सिस्टमने त्यांना त्या पदावर बसवले, तीही जाणार, असेही त्यांनी म्हटले.
मतदार याद्यांमधील कथित घोटाळा आणि विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेच्या विरोधात गांधी जयंतीच्या दिवशी देशभर विरोधी पक्ष आणि विद्यार्थी संघटनांनी शांततेत जनआंदोलन केले. या वेळी दिल्ली आणि मुंबईसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये आंदोलकांची आणि पोलिसांची झटापट झाली. दिल्लीत जंतर-मंतरच्या दिशेने निघालेल्या विद्यार्थी संघटनांच्या आणि यूथ काँग्रेसच्या सदस्यांना पोलिसांनी बॅरिकेड लावून अडवले. शेकडो आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
आंदोलक आणि विरोधी पक्षांचा मुख्य आरोप असा आहे की, निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करण्याऐवजी सत्तेतील लोकांच्या दबावाखाली काम करत आहे. कोणतीही सुनावणी न घेता मतदारांमधील अनेकांची नावे यादीतून काढून टाकली आहेत, असाही त्यांचा आरोप आहे.
मुंबईत शिवाजी पार्कवर कॉक्रोज जनता पार्टी (CJP) चे आंदोलन शुक्रवारी संध्याकाळी संपले. CJP चे संस्थापक अभिजीत दिपके संध्याकाळी आंदोलनस्थळावरून परतले. CJP च्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात काही हिंदुत्ववादी संघटनांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी लगेच कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले.