पूर्णेकर हत्येच्या तपासावर सपकाळांचा संशय, ठाण्याबाहेरील IPS अधिकाऱ्याची SIT हवी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने नसल्याचे सांगत हर्षवर्धन सपकाळ यांनी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमागे कोणती शक्ती आहे, हे चौकशीतून बाहेर आलेच पाहिजे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. पोलिसांचा आतापर्यंतचा तपास पाहिला तर कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे स्पष्ट दिसते, असा त्यांचा आरोप आहे.
सपकाळ यांनी आज ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, हत्येच्या तपासात काहीही प्रगती दिसत नाही. पूर्णेकर कुटुंबाने पुरावे दिले आणि ज्यांच्यावर संशय आहे त्यांची नावेही दिली, तरीही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असे ते म्हणाले.
एफआयआर दाखल करून घेण्यापासूनच हा तपास भरकटला आहे, असे सपकाळ यांचे म्हणणे आहे. सध्याची चौकशी वरवरची असून मुख्य आरोपींना अभय दिले जात आहे, असेही ते म्हणाले.
सध्या जी एसआयटी स्थापन झाली आहे, ती स्थानिक पोलिसांची आहे. पूर्णेकर कुटुंबाचा आणि ठाणेकरांचा या एसआयटीवर विश्वास नाही, असे सांगत त्यांनी ती केवळ धूळफेक असल्याची टीका केली. त्यामुळे ठाण्याबाहेरील आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली नवी एसआयटी स्थापन करावी आणि हत्येचा संपूर्ण तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी त्यांनी केली.
ही हत्या अत्यंत गंभीर आहे, असे सांगून सपकाळ म्हणाले की, हत्येपूर्वी प्रदीप पूर्णेकर यांनी स्वतः जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. तरीही त्या दिशेने तपासाची चक्रे फिरत नाहीत. सरकारने पूर्णेकर कुटुंबाला न्याय दिला पाहिजे, असे ते म्हणाले. या कठीण प्रसंगात काँग्रेस पक्ष पूर्णेकर कुटुंबासोबत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या भेटीच्या वेळी ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे, माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस तालुकाध्यक्ष संगीता कोटल, सेवादलाचे रविंद्र कोळी यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक झाली आहे. त्यात मुख्य आरोपी पप्या शिंदे आणि आणखी चार जणांचा समावेश आहे. पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नगरसेविका मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांनीच कट रचून प्रदीप पूर्णेकर यांची हत्या केली, असा आरोप केला आहे. या आरोपानंतर पोलिसांनी राजेंद्र शिंदे यांना सातवेळा चौकशीसाठी बोलावल्याची माहिती आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.