शनिवार, 31 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणार, साताऱ्यात आमदार हर्षदा देशमुख यांची ग्वाही

पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणार, साताऱ्यात आमदार हर्षदा देशमुख यांची ग्वाही छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
राजकारण PT24 टीम

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार हर्षदा देशमुख यांनी पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत प्राधान्याने मांडण्याची ग्वाही दिली आहे. पदवीधर मतदारांनी दाखवलेला विश्वास ही फक्त विजयाची पावती नाही, तर ती मोठी जबाबदारी आहे, असे त्या म्हणाल्या. पदवीधर, शिक्षक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण यांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. पदवीधरांचे प्रश्न, बेरोजगार तरुणांच्या अडचणी, शिक्षणातील समस्या आणि प्रलंबित मागण्यांना विधान परिषदेत प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर आमदार देशमुख पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात आल्या. त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचे उत्साहात स्वागत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनाकडे ठोस पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये राहावे लागते. मात्र दुष्काळी परिस्थिती आणि वाढता खर्च यामुळे अनेक विद्यार्थ्यांना हा खर्च पेलवणे कठीण होत आहे. याबद्दल विचारले असता, विद्यार्थ्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच एनआयईएसच्या पोर्टलमधील तांत्रिक अडचणी आणि संथ कारभार सुधारण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्या म्हणाल्या.

आपल्या विजयाचे श्रेय देशमुख यांनी महाविकास आघाडीच्या एकजुटीला दिले. निवडणुकीत आघाडीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम केले, असे त्या म्हणाल्या. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचाराचे प्रभावी नियोजन करून संपूर्ण यंत्रणा ताकदीने राबवली, असे सांगून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे विजयाचा मार्ग सुकर झाला, असेही त्यांनी म्हटले.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी निवडणुकीतील यश हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीचे फळ असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या सत्कार समारंभाला माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, समीर घाटगे यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, महिला आघाडीचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#नागपूर#सियासत#PT24#Politics#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ