पुण्यात 'नवदुर्गा पुरस्कार २०२६' सोहळा; कला, क्रीडा, समाजसेवा क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
माणुसकी फौंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ पुणे मेन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला 'नवदुर्गा पुरस्कार २०२६' सोहळा नुकताच पुणे शहरात पार पडला. मोठ्या उत्साहात आणि सकारात्मक वातावरणात झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना 'नवदुर्गा पुरस्कारा'ने गौरविण्यात आले.
या सर्व पुरस्कारांच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे विद्यमान आमदार मा. श्री. चेतन तुपे उपस्थित होते. त्यांच्यासोबत माजी आमदार, ज्येष्ठ साहित्यप्रेमी आणि कलाप्रेमी मा. श्री. उल्हासदादा पवारही आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आणि मनोगतात बोलताना तुपे यांनी, "देवीच्या वेगवेगळ्या रूपाप्रमाणे आजच्या नवदुर्गा सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. पुरुषप्रधान संस्कृती असली तरी महिलांना प्रत्येक क्षेत्रात मानसन्मान मिळाला पाहिजे व त्यांचा सहभाग वाढला पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी आग्रही असले पाहिजे," असे प्रतिपादन केले.
माजी आमदार उल्हासदादा पवार यांनीही यावेळी विचार मांडले. त्यांनी स्व. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी प्रसंग सांगितले. ते ऐकून उपस्थित मंडळी अंतर्मुख झाली.
कला, क्रीडा, समाजसेवा, उद्योग आणि इतर क्षेत्रांत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या खालील मान्यवर महिलांना या विशेष सोहळ्यात 'नवदुर्गा पुरस्कार' प्रदान करण्यात आला: सिनेअभिनेत्री असावरी तारे, राष्ट्रीय जलतरणपटू व गायिका श्रृंगेरी भावसार, श्वेता लिमये, समाजसेविका राखी रासकर आणि जया जोशी, आकांक्षा वाघ, उद्योजिका व ब्युटीशियन मंजुषा देशमुख, मा. आरतीताई करंजावणे आणि मानसी चंदगडकर.
या कार्यक्रमाला जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन सेंट्रल कमिटीचे सदस्य डॉ. अनिल माळी, माजी अध्यक्ष डॉ. सुवर्णा माळी, माणुसकी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेंद्र भवाळकर, सुरेश धनावडे, सूर्योदय वृद्धाश्रमाच्या संस्थापिका छायाताई भगत, सौ. रसिका भवाळकर, युवराज दिसले, मधुकर्णिका सासवडे, जितेंद्र बाराते, सुवर्णा काणे, निशा पाचोरकर, अशोक जगताप आणि दिलीप कारमपुरी हे मान्यवरही मोठ्या संख्येने हजर होते.
सन्मान स्वीकारताना विजेत्या महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आयोजकांचे आभार मानले. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रसिका भवाळकर यांनी केले. हा सोहळा उपस्थित महिलांना नवी प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरला.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.