प्रेयसीचे हट्ट पुरवण्यासाठी बी.टेक. इंजिनिअर बनला ट्रेनमधला चोर, ग्वाल्हेरमध्ये 34 बॅगा जप्त
ग्वाल्हेर रेल्वे पोलिसांनी दिलीप मौर्या या बी.टेक. इंजिनिअरला अटक केली असून त्याच्याकडून 34 बॅगा जप्त केल्या आहेत.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, आणि त्या आंधळेपणापायी माणूस गुन्हेगारीच्या वाटेला लागल्याची उदाहरणं अनेकदा समोर आली आहेत. मध्य प्रदेशात असाच एक प्रकार उघड झाला आहे. प्रेयसीचे हट्ट पुरवता पुरवता आपण चोरीच्या मार्गावर कधी गेलो, हे त्या तरुणाला कळलंच नाही. विशेष म्हणजे तो चांगला शिकलेला असून बी.टेक. इंजिनिअर आहे. तरीही प्रेमापोटी त्याने हे पाऊल उचललं.
आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे या तरुणाचे वडील एअर फोर्समध्ये काम करतात. अशा चांगल्या कुटुंबातून आलेल्या या मुलाने आंधळ्या प्रेमापोटी घरच्यांची मान शरमेने खाली घालवली.
ग्वाल्हेर जीआरपी म्हणजे रेल्वे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. तो स्वतः बी.टेक. इंजिनिअर आहे. प्रेयसीचे हट्ट पुरवण्यासाठी तो लांब पल्ल्याच्या ट्रेनमधील एसी डब्यांमध्ये प्रवाशांचं सामान चोरायचा. आधी तो श्रीमंत प्रवाशांना हेरायचा. ते झोपले की त्यांची बॅग घेऊन जो स्टेशन येईल तिथे उतरायचा. पोलिसांनी त्याच्याकडून 34 बॅगा जप्त केल्या असून त्यातील सामानाची किंमत 8 लाख 26 हजार रुपयांच्या घरात आहे.
प्रवाशांना लुटण्यासाठी आरोपी एक खास पद्धत वापरायचा, असं सांगितलं जातं. तो चांगले आणि महागडे कपडे घालून एसी कोचने प्रवास करायचा, म्हणजे इतर प्रवाशांना त्याच्यावर संशय येणार नाही. प्रवासात तो बाकीच्या प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचा. त्यांचं लक्ष दुसरीकडे गेलं की त्यांची बॅग घेऊन पुढच्या स्टेशनवर उतरायचा.
आरोपीचं नाव दिलीप मौर्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार बी.टेक. इंजिनिअर असलेल्या दिलीपचे वडील सध्या एअर फोर्समध्ये काम करतात. प्रेयसीची हौस आणि हट्ट पुरवण्यासाठी दिलीपने चोरी सुरू केली.
तपासादरम्यान जीटी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चोरीच्या सामानाचं प्रकरणही समोर आलं. गोल का मंदिर परिसरातील प्रगती विहारचे रहिवासी दीपक शर्मा यांच्या सामानाचा तपास करताना दिलीप पोलिसांच्या जाळ्यात सापडला. शिवाय नागपूरची रहिवासी असलेल्या विशाखा शशिकांत यांच्या सामानाच्या चोरीच्या प्रकरणातही दिलीपचं नाव पुढे येत आहे.
जीआरपीने आरोपीकडून सर्व 34 बॅगा जप्त केल्या आहेत. त्यात ट्रॉली बॅग, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर महागड्या वस्तूंचा समावेश आहे. जीआरपीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी किर्ती नरवरिया यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी सुरुवातीला एका फायनान्स कंपनीत काम करायचा. आर्थिक नुकसान झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदलली आणि मग त्याने चोरी करायला सुरुवात केली.
आता पोलीस हे शोधत आहेत की त्याने कोणकोणत्या ट्रेनमधील प्रवाशांना लक्ष्य केलं होतं आणि जप्त केलेलं सामान कोणत्या प्रवाशांचं आहे. आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. या चौकशीतून जप्त सामानाबद्दल योग्य ती माहिती मिळेल आणि प्रकरणाशी संबंधित आणखी किती तथ्यं समोर येतील, अशी जीआरपीला अपेक्षा आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.