पोटगीच्या वादातून बोलावून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोंभुर्णा तालुक्यात वैवाहिक वादातून एका ३६ वर्षीय तरुणाला वाद मिटवण्याच्या बहाण्याने बोलावून बेदम मारहाण करण्यात आली.
पोंभुर्णा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कौटुंबिक वादाचे पर्यावसान थेट रस्त्यावरील मारहाणीत झाल्याची घटना समोर आली आहे. कौटुंबिक न्यायालयातील वैवाहिक वादाचा राग मनात ठेवून एका ३६ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून पोंभुर्णा पोलिसांनी मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंदवला आहे.
जामतुकुम येथे राहणारे संदीप तुकाराम कोमलवार (वय ३६) यांचा २०२० साली कोमल यांच्याशी विवाह झाला होता. मात्र शंका-कुशंकेवरून पती-पत्नीमध्ये सतत खटके उडत असल्याने गेल्या वर्षीपासून पत्नी चंद्रपूरला माहेरी निघून गेली होती. सध्या या दोघांमध्ये बल्लारपूर कोर्टात पोटगीचा खटला सुरू आहे. २१ सप्टेंबर रोजी या खटल्याची तारीख असल्याने संदीप कोमलवार दुचाकीवरून बल्लारपूरला गेले होते.
काम आटोपून संध्याकाळी साधारण पाच वाजता ते घराकडे परतत असताना येनबोळी येथील एका हॉटेलजवळ त्यांना पत्नी, मुले, मेहुणा चेतन आणि साळपिंडूचे मामा हुसेन चंचलवार नाश्ता करताना दिसले. संदीप यांनी आपल्या मुलाला नाश्ता देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पत्नीने मुलाला दूर नेले. यावरून वाद सुरू झाला आणि मेहुणा व त्याच्या मामाने संदीप यांना धक्काबुक्की केली.
या वादानंतर संदीप यांनी हुसेन चंचलवार यांचा मुलगा किरण चंचलवार याला फोन करून वडिलांच्या वागण्याबद्दल जाब विचारला. त्यावर किरणने वाद मिटवण्याच्या बहाण्याने संदीप यांना थेरगाव रस्त्यावरील एका बारजवळ दारू पिण्यासाठी बोलावले. रात्री साधारण सात वाजता संदीप तिथे पोहोचले असता, दोन दुचाकींवरून आलेल्या किरण चंचलवार आणि त्याच्या दोन साथीदारांनी मागून अचानक हल्ला केला. त्यांना गाडीवरून खाली पाडून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीदरम्यान आपल्याला पत्नीचाही आवाज ऐकू आल्याचा दावा संदीप यांनी तक्रारीत केला आहे. मारहाणीत संदीप यांच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
गंभीर जखमी अवस्थेत संदीप तिथून पळून गेले आणि रस्त्यावरून येणाऱ्या वाहनचालकांकडे मदत मागितली, मात्र रक्ताने माखलेल्या अवस्थेतील तरुणाला बघून कोणीही पुढे आले नाही. अखेर स्वतःच दुचाकी चालवत त्यांनी देवाडा गाठले आणि तिथून एका व्यक्तीच्या गाडीने जामतुकुम येथील घर गाठले. गावकऱ्यांनी तातडीने ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांना बोलावले.
पोंभुर्णा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमी संदीप यांना सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. संदीप कोमलवार यांच्या तक्रारीवरून पोंभुर्णा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी किरण चंचलवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नरेश निमगडे करत आहेत.