मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:52 IST

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून महिलेकडून साडेसात लाख घेतल्याचा आरोप; नाशिकमध्ये बाबावर गुन्हा

आजार बरा करण्याचे आणि पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून नाशिकमध्ये अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पैशाचा पाऊस पाडतो म्हणून महिलेकडून साडेसात लाख घेतल्याचा आरोप; नाशिकमध्ये बाबावर गुन्हा छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आजार बरा करतो आणि घरात पैशाचा पाऊस पाडतो, अशी आश्वासने देऊन एका भोंदूबाबाने महिलेकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. पूजेच्या नावाखाली महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवण्यात आल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकारात महिलेचे एकूण साडेसात लाख रुपये गेले आहेत.

तक्रारीनुसार, या महिलेला आजाराचा त्रास होता. नाशिकच्या गंगापूर परिसरात राहणाऱ्या अरुण धोंडू पाटील याच्याकडे दैवी शक्ती आहे, असे तिला कळले होते. आजार बरा होईल या आशेने तिने त्याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने महिलेला नाशिकला आणण्यासाठी गाडी पाठवली. महिला आणि तिच्या पतीच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून त्यांना नाशिकला आणण्यात आले आणि पूजा झाल्यावर त्याच पद्धतीने परत सोडण्यात आले. दुसऱ्यांदा विधी झाल्यानंतर आजारात सुधारणा झाल्यासारखे वाटल्याने महिलेचा त्याच्यावर विश्वास बसला, असे तक्रारीत म्हटले आहे.

विश्वास बसल्यानंतर भोंदूबाबाने पैशाचा पाऊस पाडून देण्याचे आमिष दाखवले, असा आरोप आहे. त्यासाठी मासिक पाळीच्या रक्ताने माखलेले कपडे आणायला त्याने सांगितले. त्यानुसार महिलेला पुन्हा गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ आणण्यात आले. तिथे झालेल्या कथित अघोरी विधीत महिलेचे कपडे काढून तिला पांढरे, पारदर्शक पातळ वस्त्र नेसवण्यात आले, तिच्या अंगावर पाणी टाकण्यात आले आणि रक्ताने माखलेल्या कपड्यांची पूजा करण्यात आली, असे सांगितले जाते. या विधीसाठी मानवी कवटी, तांदूळ, हळद, कुंकू, गुलालाचे पाणी आणि बुक्का अशा वस्तू वापरल्याचा आरोप आहे.

या पूजेसाठी महिलेने पाच लाख रुपये दिले होते. भोंदूबाबाने सुमारे दोन तास मंत्रोच्चार करून विधी केल्याचे सांगितले जाते. त्या वेळी बोकडाचा बळी दिल्याचाही आरोप आहे. विधी पूर्ण झाला, घरी गेल्यावर पैशाचा पाऊस पडेल, असे सांगून महिला आणि तिच्या पतीला पुन्हा डोळ्यांवर पट्टी बांधून परत पाठवण्यात आले. अशा तीन विधींच्या नावाखाली महिलेकडून एकूण साडेसात लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.

अपेक्षित परिणाम दिसला नाही. महिलेचा आजार बरा झाला नाही आणि पैशाचा पाऊसही पडला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पैसे परत मागायला सुरुवात केली, पण भोंदूबाबाकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे.

या फसवणुकीची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन सगळे प्रकरण त्यांच्या कानावर घातले. त्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण धोंडू पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जादूटोणाविरोधी कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार ही कारवाई झाली आहे.

दैवी शक्ती, मंत्र-तंत्र किंवा अघोरी पूजेच्या नावाखाली पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून इतरांचीही फसवणूक झाली असण्याची शक्यता आहे. म्हणून अशा प्रकाराला बळी पडलेल्या नागरिकांनी पुढे येऊन गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांनी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ