'पहला प्यार दूसरी बार'चा ट्रेलर आला; सहा नवीन कलाकारांचं मोठ्या पडद्यावर पदार्पण, 23 ऑक्टोबरला रिलीज
'पहला प्यार दूसरी बार' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यात सहा नवोदित कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2026 ला जगभरात प्रदर्शित होणार आहे.
'पहला प्यार दूसरी बार' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच समोर आला आहे आणि त्यातून सिनेमाच्या टायटलचा नेमका अर्थ काय, हे उलगडताना दिसतंय. या ट्रेलरमध्ये सिनेमातले सगळे डेब्यूटंट कलाकार आपल्या दमदार अभिनयाने लक्ष वेधून घेत आहेत, त्यामुळे सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
ट्रेलर बघितलं तर लक्षात येतं की यात तरुणाईचे नवे रंग भरलेले आहेत. नुसते मजेशीर वन-लाइनर्स नाहीत, तर रोमान्स, मैत्री, जुना क्रश आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळही यात दिसतो. क्वर्की जोक्स, मिश्कील शिव्या आणि एकमेकांची सतत खेचत राहण्याची स्टाइल यामुळे कथेत खणखणीत विनोदाचा तडका बसलाय. त्यामुळे हा सिनेमा एक फ्रेश आणि नक्की बघण्यासारखा अनुभव ठरेल, असे संकेत मिळतायत.
या सिनेमातून स्पर्श वालिया, अलीशा चोप्रा, कुणाल वैद, साक्षी वैद्य, तुषार छिब्बर आणि सरगुन कौर लुथरा हे सहा कलाकार मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत. व्हायब्रंट एनर्जी, सहज वाटणारी केमिस्ट्री आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स हे या नव्या टीमचं वैशिष्ट्य असल्याचं सांगितलं जातंय. या कलाकारांचा मजेदार परिचय आधीच झाला होता, आणि आता निर्मात्यांनी ट्रेलरमधून या नव्या टीमची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे. या सहा नव्या चेहऱ्यांच्या दमदार परफॉर्मन्ससह हा सिनेमा एक फन-फिल्ड राइड ठरण्याच्या तयारीत आहे.
निर्माते लव रंजन यांनी याबद्दल बोलताना सांगितलं, "'पहला प्यार दूसरी बार'ची कथा त्या आठवणींशी जोडलेली आहे, ज्यांच्याकडे आपण सगळेच पुन्हा पुन्हा वळून बघतो, शाळा, मैत्री, क्रश आणि तो काळ खास बनवणारी माणसं. या सिनेमातील व्यक्तिरेखा तरुण पिढीतील असल्या, तरी त्यांच्याशी जोडलेल्या भावना सगळ्यांनाच लागू होणाऱ्या आहेत. या ह्युमर आणि यंग रोमान्सच्या दुनियेत सहा नव्या कलाकारांना घेऊन येणं हा अनुभव आणखी रोमांचक ठरला आहे. प्रेक्षक त्यांना आणि त्यांच्या प्रवासाला कसं स्वीकारतात, हे बघण्यासाठी मी उत्सुक आहे."
दिग्दर्शक अनुज सैनी यांनीही आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, "'पहला प्यार दूसरी बार' माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. हा प्रवास सुरू करण्यासाठी यापेक्षा जास्त उत्साही आणि भन्नाट टीम मला मिळाली नसती. या सहा तरुण कलाकारांनी सिनेमात काय आणलंय, याबद्दल मी खूप उत्साहित आहे आणि आम्ही मिळून तयार केलेला हा अनुभव प्रेक्षकांना अखेर कसा वाटतो, हे बघण्यासाठी मी आतुर आहे."
'पहला प्यार दूसरी बार' हा सिनेमा 'लव फिल्म्स'तर्फे प्रस्तुत केला जात असून त्याचं दिग्दर्शन अनुज सैनी यांनी केलं आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा 23 ऑक्टोबर 2026 रोजी जगभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित होणार आहे.