ओवैसींनी सांगितला गडकरींसोबतचा किस्सा, भाजपवर टीका करत मानले आभार
बिहारमधील एमआयएमच्या पाच आमदारांना गडकरींनी दिलेल्या वेळेचा किस्सा ओवैसींनी सांगितला, आणि त्याच वेळी भाजपवरही टीका केली.
देशातील राजकारणात सध्या रोजच नव्या घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जाहीर आभार मानले आहेत. गडकरी हे ओवैसींचे कट्टर विरोधक मानले जातात, त्यामुळे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.
रविवारी, 20 सप्टेंबरला ओवैसी कानपूरमध्ये होते. तिथे त्यांनी बिहारमध्ये निवडून आलेल्या आपल्या पाच आमदारांची गडकरींसोबत झालेली भेट आणि त्यानंतरचा एक किस्सा सांगितला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
ओवैसी म्हणाले की, बिहारमध्ये एमआयएमचे पाच आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली होती. या भेटीत गडकरींनी आमदारांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना तब्बल 45 मिनिटे वेळ दिला. या भेटीत आमदारांनी जुन्या पुलांचा प्रश्न, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधांबाबत गडकरींना माहिती दिली. त्यानंतर आपण गडकरींना सर, तुम्ही फोन करून काम सुरू करायला सांगा, अशी विनंती केली, असं ओवैसींनी सांगितलं. गडकरींनी त्यावर लगेच फोन केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना काम लवकर सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
याच भेटीत गडकरींनी अधिकाऱ्यांना, मजलिसवाले माझ्या घरी येऊन बसले आहेत, असं सांगितल्याचा किस्साही ओवैसींनी सांगितला. यामुळेच ओवैसींनी गडकरींचे जाहीर आभार मानले.
यानंतर ओवैसींनी उत्तर प्रदेशच्या राजकारणावरही भाष्य केलं. आगामी विधानसभा निवडणूक 2014, 2017, 2019 किंवा 2022 सारखी नसेल, तर ती वेगळी आणि आव्हानात्मक असेल असा दावा त्यांनी केला. भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. समाजवादी पार्टीच्या काळात यादव राजकारणाची चर्चा होत होती, तर आता ठाकूर वर्चस्वाची चर्चा होत असल्याचं ओवैसी म्हणाले.
उत्तर प्रदेशातील विकास, वीज आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरूनही ओवैसींनी सरकारला घेरलं. भाजपच्या सत्ताकाळात गरीबांच्या जमिनी बळकावल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला. पूर्वी समाजवादी पार्टीच्या सरकारमध्ये वेगळ्या पद्धतीची गुंडगिरी होती, आता योगी सरकारमध्ये वेगळ्या प्रकारची गुंडगिरी आहे, असं ओवैसी म्हणाले.
राम मंदिराशी संबंधित कथित हेराफेरीच्या एसआयटी रिपोर्टचाही ओवैसींनी मुद्दा उपस्थित केला. हा रिपोर्ट सरकार जाहीर का करत नाही, असा सवाल त्यांनी केला. संबंधित प्रकरणांतील आरोपींना जामीन कसा मिळतो, हाही आगामी निवडणुकीतील चर्चेचा मुद्दा असेल, असं ते म्हणाले.
दरम्यान, एकीकडे गडकरींचे जाहीर आभार आणि दुसरीकडे भाजपवर केलेली टीका, या दोन्ही गोष्टींमुळे ओवैसींच्या वक्तव्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.