नागपूर: न्यूज चॅनेलमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 20 लाखांची फसवणूक, पिस्तूल दाखवून 50 हजार लुटले, सात जणांवर
नागपूर जिल्ह्यातील मेडिकल स्टोअर चालकाला न्यूज चॅनेलमध्ये पार्टनर बनवण्याचे आणि गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. रक्कम परत मागितल्यावर मारहाण, पिस्तुलाच्या धाकाने लूट आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप असून सीताबर्डी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला
नागपूर जिल्ह्यातील एका न्यूज चॅनेलमध्ये पार्टनर बनवण्याचे आणि गुंतवणुकीवर नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका मेडिकल स्टोअर चालकाची तब्बल 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, गुंतवलेली रक्कम परत मागितल्यावर त्याला मारहाण करण्यात आली, पिस्तूल दाखवून धमकावत त्याच्याकडील 50 हजार रुपये रोख लुटण्यात आले आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोसर भवन चौक येथे राहणारे निशांत प्रमोद गुप्ता (43) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये रितेश बोरकर, प्रमोद भागचंदानी, विजय खवसे, रिंकू पानतावणे, उमेश यादव, सुजीत भोयर आणि सुनील मांगलकर यांचा समावेश आहे. या प्रकरणानंतर प्रमोद भागचंदानी पुन्हा एकदा चर्चेत आला असून गेल्या चार दिवसांतील त्याच्याविरुद्धची ही तिसरी एफआयआर आहे.
निशांत गुप्ता हे नागपूरमधील मेयो हॉस्पिटलसमोर कांचन मेडिकल स्टोअर चालवतात. सन 2022 मध्ये त्यांची ओळख स्वतःला महा न्यूज 7 या चॅनेलचा संचालक सांगणाऱ्या रितेश बोरकर याच्याशी झाली होती. रितेशने गुप्ता यांना गुंतवणुकीसाठी तयार केले आणि नंतर सांगितले की, चॅनेल पुढे नेण्यासाठी गुंतवणूकदारांची गरज आहे आणि यातून चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवले.
रितेशच्या सांगण्यावरून गुप्ता यांनी वेगवेगळ्या वेळी रोख रक्कम, ऑनलाइन आणि आरटीजीएसच्या माध्यमातून एकूण सुमारे 20 लाख रुपये दिले. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या ओळखीच्या अनिल पटेल यांच्याकडून आणखी 2 लाख रुपये घेऊन तेही रितेशला दिले. रितेशने पार्टनरशिप डीड तयार करण्याचे आश्वासन दिले आणि सुरक्षेच्या नावाखाली एचडीएफसी बँकेचा गुप्ता यांच्या स्वाक्षरीचा कोरा चेकही घेतला.
काही दिवसांनी गुप्ता यांनी आपण गुंतवलेली रक्कम आणि त्यावरील नफ्याबद्दल विचारणा सुरू केली, तेव्हा रितेश टाळाटाळ करू लागला. 15 मे 2025 रोजी रितेशने निशांत यांना न्यूज चॅनेलच्या कार्यालयात बोलावून घेतले. तिथे रितेश बोरकरसोबत उमेश यादव, सुजीत भोयर, सुनील मांगलकर, रिंकू पानतावणे, प्रमोद भागचंदानी आणि विजय खवसे हे उपस्थित होते.
निशांत यांनी आपली रक्कम परत मागताच उपस्थित आरोपींनी शिवीगाळ आणि मारहाण सुरू केल्याचा आरोप आहे. आरोपानुसार, प्रमोद भागचंदानीने पिस्तूल दाखवून धमकावले आणि त्यांच्या खिशातून 50 हजार रुपये रोख काढून घेतले, तर रिंकू पानतावणेने स्वतःचे कपडे फाडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, असाही आरोप आहे. या प्रकरणाचा नागपूर पोलीस तपास करत आहेत.