आदित्य ठाकरे परदेशात गेल्याचा नितेश राणेंचा दावा, दिशा सालियान प्रकरणाच्या चौकशीची मागणी
गर्जना मोर्चात आदित्य ठाकरे दिसले नाहीत, यावरून मंत्री नितेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणाचा उल्लेख करत दावा केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ठाकरे बंधूंनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजर होते. मोठ्या संख्येने नागरिक आणि कार्यकर्तेही मोर्चात सामील झाले होते.
या मोर्चात आदित्य ठाकरे दिसले नाहीत. ते आजारी असल्यामुळे आले नाहीत, असे बोलले जात आहे. याच गोष्टीवरून मंत्री नितेश राणे यांनी मोठा दावा केला आहे. आदित्य ठाकरे विदेशात पळून गेले, असे त्यांनी सांगितले आहे.
गर्जना मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकदा एका व्यासपीठावर आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात या मोर्चाची चांगलीच चर्चा झाली. आता महायुतीचे नेते यावरून टीका करत असल्याचे दिसत आहे.
नितेश राणे यांचा थेट दावा असा की, दिशा सालियान प्रकरणात नाव येत असल्यामुळे आदित्य ठाकरे विदेशात पळून गेले. यावर ते म्हणाले, "मला वाटतं म्हणूनच मी वारंवार ही मागणी करत आहे आणि माझी चिंता व्यक्त करत आहे. गंभीर गुन्ह्यांच्या तपासात एखाद्या व्यक्तीचे नाव वारंवार समोर येत असेल, तर त्या व्यक्तीची चौकशी करून सत्य परिस्थिती तपासणे ही तपास यंत्रणांची जबाबदारी आहे." दिशा सालियान प्रकरणाच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असेही त्यांनी म्हटले.
आदित्य ठाकरे यांच्या गैरहजेरीबद्दल राणे म्हणाले, "काल आदित्य ठाकरे व्यासपीठावर उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण आजारपण असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यावरून ते देशाबाहेर गेले आहेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत, असा निष्कर्ष काढता येणार नाही कदाचित देशाबाहेर गेले सुद्धा असेल त्यांच्या घरी तपासावे."
आपली भूमिका मांडताना राणे पुढे म्हणाले, "माझी एवढीच मागणी आहे की, जर तपास यंत्रणेला एखाद्या व्यक्तीच्या परदेशात जाण्याबाबत कायदेशीर कारणांमुळे शंका किंवा आवश्यकता वाटत असेल, तर कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या प्रक्रियेचा वापर करावा. लुकआउट नोटीस, पासपोर्ट जप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई ही केवळ आरोपांवर नव्हे, तर ठोस पुरावे आणि कायदेशीर प्रक्रियेच्या आधारेच झाली पाहिजे. कोणीही कितीही मोठ्या पदावर असो, तपास निष्पक्ष झाला पाहिजे आणि सत्य समोर आले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे, हीच माझी भूमिका आहे."
या सगळ्यामुळे दिशा सालियान प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.