नागपूर स्टेशनवरून 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण, GRP ने कारने 670 किमी पाठलाग करत मिर्झापूरमध्ये आरोपीला पकडले
नागपूर रेल्वे स्टेशनवर वडिलांना फसवून लहान मुलाला घेऊन गेलेल्या आरोपीला GRP पोलिसांनी 48 तासांत मिर्झापूर स्टेशनवर अटक केली.
नागपूर रेल्वे स्टेशनवर आपल्या 6 वर्षांच्या मुलासोबत (बदललेले नाव अर्जुन) थांबलेल्या एका हतबल वडिलांना फसवून मुलाचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या 48 तासांत पकडले. बिहारमधील नालंदा जिल्ह्याचा रहिवासी मिथुनकुमार दयाचंद्र पासवान (21) असे आरोपीचे नाव आहे. त्याला मिर्झापूर रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले. या कारवाईसाठी GRP पथकाने तब्बल 670 किलोमीटरचा प्रवास कारने करत ट्रेनचा पाठलाग केला.
राजस्थानचे चंपतलाल चौहान (38, बदललेले नाव) यांची पत्नी कोरोना काळात वारली. त्यानंतर तीन मुलांचे पालनपोषण करण्यासाठी ते हैदराबादला जाऊन मजुरी आणि मूर्ती रंगवण्याचे काम करू लागले. त्यांच्या मुलांचे वय 13, 8 आणि 6 वर्षे असून अर्जुन हा सर्वात लहान मुलगा आहे. हैदराबादेत काम न मिळाल्याने ते ट्रेनने आपल्या गावी परतत होते.
सिकंदराबाद स्टेशनवर त्यांची भेट मिथुनशी झाली. मिथुनने स्वतःची कंपनी असल्याचे आणि तिथे नोकरी देण्याचे आमिष दाखवले. या भूलथापांना बळी पडून चौहान यांनी त्याचे म्हणणे मान्य केले. मिथुनने त्यांच्यासाठी जनरल तिकीट काढले आणि सिकंदराबादहून नागपूरला घेऊन आला. संध्याकाळी साधारण 6.30 वाजता नागपूरला पोहोचल्यावर मिथुनने सर्वांना जेवण दिले आणि इथून पुढे ट्रेन बदलावी लागेल असे सांगितले. यादरम्यान चौहान मुलांसाठी औषध आणायला गेले असता मिथुन अर्जुनला घेऊन निघून गेला. बराच वेळ झाला तरी तो परतला नाही, तेव्हा घाबरलेल्या चौहान यांनी GRP मध्ये तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच GRP च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि विविध शाखांनी तपास सुरू केला. रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मिथुन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या असलेल्या 12159 अमरावती-जबलपूर एक्स्प्रेसमध्ये अर्जुनला घेऊन चढताना दिसला. पीआय गौरव गावंडे यांच्या चौकशीदरम्यान चौहान यांनी सांगितले की आरोपीची बोलीभाषा बिहारी ढंगाची होती.
त्यानंतर लगेचच आरोपीचा फोटो जारी करून बिहारकडे जाणाऱ्या सर्व ट्रेनच्या कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला. मिथुन उत्तर प्रदेशमार्गे बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर GRP पथकाला थेट कारने बिहारच्या दिशेने रवाना करण्यात आले. लोकेशन ट्रेस करत 670 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून पथक ट्रेनच्याही आधी मिर्झापूर स्टेशनवर पोहोचले.
तिथे आरोपी मिथुनला अटक करण्यात आली आणि त्याच्या ताब्यातून अर्जुनला सोडवण्यात आले. दोघांनाही नागपूरला परत आणण्यात आले. मिथुनने हे अपहरण मानवी तस्करीच्या हेतूने केले की अन्य कारणासाठी, याचा तपास पोलीस अजून करत आहेत. आपल्या मुलाला सुखरूप पाहून चौहान यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्यांनी GRP पोलिसांचे आभार मानले. एसी शिंदे आणि अतिरिक्त एसपी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय गावंडे, एसआय इंगळे, मिश्रा, येलेकर, धोंगडे आणि अली यांनी ही कारवाई पार पाडली.