नागपूर रेल्वे स्टेशनवरून सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण; चोवीस तासांत आरोपीला मिर्झापूरमधून पकडून मुलाची सुखरूप
नागपूर लोहमार्ग पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत अवघ्या चोवीस तासांत आरोपीला उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून अटक केली आणि अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली.
नागपूर रेल्वे स्टेशनवरून एका सहा वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली. मात्र लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अवघ्या चोवीस तासांत आरोपीला उत्तर प्रदेशातील मिर्झापूरमधून पकडण्यात यश आले आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली.
अपहरण झालेल्या मुलाचे वडील मूळचे राजस्थानचे आहेत. ते आपल्या तीन मुलांना घेऊन कामाच्या शोधात हैदराबादला गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना काम मिळाले नाही. त्यामुळे ते सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरून पुन्हा राजस्थानला परत निघाले होते. या प्रवासादरम्यान त्यांची ओळख मिथुन कुमार पासवान नावाच्या आरोपीशी झाली. मूळचा बिहारचा असलेला मिथुन याने वडिलांना सांगितले की, तो त्यांना आपल्या ओळखीच्या एका कंपनीत काम मिळवून देईल. या बोलण्यावर विश्वास ठेवून वडील त्याच्यासोबत सिकंदराबादवरून नागपूरला आले.
नागपूर रेल्वे स्टेशनवर हे कुटुंब थांबले असताना मुलांसाठी औषध आणण्यासाठी वडील स्टेशनच्या बाहेर गेले. वडील बाहेर गेल्याची नेमकी हीच संधी साधून आरोपी मिथुन पासवान याने सहा वर्षांच्या मुलाला घेऊन तिथून पळ काढला, असा आरोप आहे.
ही घटना नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या लक्षात येताच आणि मुलाच्या अपहरणाची तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला वेग दिला. सुरुवातीला सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीने कोणत्या दिशेला जाणारी ट्रेन पकडली, याचा शोध घेण्यात आला. त्यानंतर मार्गातील सगळ्या रेल्वे स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले. या तपासाच्या आधारे एक पथक बिहारच्या दिशेने आणि दुसरे पथक उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना करण्यात आले, जेणेकरून आरोपीचा माग काढता येईल.
तपासादरम्यान आरोपी अपहरण केलेल्या मुलासह मिर्झापूर रेल्वे स्टेशनवर उतरल्याचे निष्पन्न झाले. ही माहिती मिळताच तातडीने मिर्झापूर पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक करण्यात आली आणि मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे मुलगा आरोपीच्या तावडीतून सुखरूप सुटला, याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.