नागपुरात वडिलांनी 19,800 रुपयांना जुनी कार विकली, मुलाने रागातून गळफास घेत आयुष्य संपवले
नागपुरातील बाबा दीपसिंहनगर भागात 33 वर्षीय तरुणाने घरातील जुनी कार विकल्याच्या रागातून गळफास घेऊन आत्महत्या केली.
नागपूर शहरातील बाबा दीपसिंहनगर या भागात एक कुटुंब राहते. या कुटुंबातील घरची जुनी कार विकल्याच्या रागातून 33 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत तरुणाचे नाव अनिकेत राजेंद्र गजभिये असे आहे. ही घटना बुधवारी घडली आणि त्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनिकेतचे वडील राजेंद्र यांच्याकडे एमएच-31-जेड-7577 क्रमांकाची जुनी ओमनी कार होती. ही कार गेली पाच ते सहा वर्षे वापरातच नव्हती. इतकी वर्षे घरासमोर तशीच उभी राहिल्याने कार पूर्णपणे खराब झाली होती आणि ती कोणत्याही उपयोगाची राहिली नव्हती.
बुधवारी दुपारच्या सुमारास एक कबाडीवाला ही जुनी कार विकत घेण्यासाठी राजेंद्र यांच्या घरी आला. कार बरेच दिवस खराब अवस्थेत घरासमोर उभी असल्याने राजेंद्र यांनी अखेर ती विकून टाकण्याचा निर्णय घेतला. राजेंद्र आणि कबाडीवाला यांच्यात बोलणी झाली आणि 19,800 रुपयांना कार विकण्याचा सौदा ठरला. सौदा पक्का झाल्यानंतर काही वेळातच कबाडीवाल्याने ठरलेले पैसे राजेंद्र यांना दिले आणि कार घेऊन तो निघून गेला.
याच दिवशी संध्याकाळी साधारण 6.20 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र यांनी आपला मुलगा अनिकेत याला घरातील जुनी कार विकल्याची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांकडून कार विकल्याचे ऐकताच अनिकेत प्रचंड संतापला. रागाच्या भरात त्याने कथितरित्या आपल्या आईचा मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. मोबाईल फोडल्यानंतर तो रागातच घरातील स्वतःच्या खोलीत गेला आणि आतून दरवाजा बंद करून घेतला.
काही वेळाने वडील राजेंद्र त्याला बाहेर बोलावण्यासाठी खोलीच्या दाराशी आले, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ हाक मारूनही अनिकेतकडून काहीच उत्तर न आल्याने घरातील लोकांना शंका आली. त्यानंतर घरच्यांनी प्रयत्न करून जबरदस्तीने खोलीचा दरवाजा उघडला असता, आतमध्ये अनिकेत फास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळला.
हे दृश्य पाहताच घरच्यांनी तातडीने त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामासह आवश्यक ती कारवाई सुरू केली.
पोलिसांनी सांगितले की, अनिकेतचा स्वभाव थोडा चिडखोर होता आणि त्याच्यावर याआधीपासूनच मानसिक आजारावर उपचारही सुरू होते. मात्र घरातील जुनी कार विकल्याच्या घटनेनंतरच त्याने हे इतके टोकाचे पाऊल का उचलले, याच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत.
कपिलनगर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, कुटुंबातील सदस्यांचे जबाब नोंदवण्याचे तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींची तपासणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.