नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी निवृत्त कर्मचाऱ्यांना घातला दीड कोटींचा गंडा
नागपुरात दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सायबर भामट्यांनी निवृत्त रेल्वे गार्ड आणि नागपूर विद्यापीठाच्या निवृत्त सहायक कुलसचिवांना डिजिटल अरेस्टच्या धाकाने १.७ कोटी रुपयांना गंडा घातला.
नागपुरात पुन्हा एकदा 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली सायबर ठगीचा प्रकार समोर आला आहे. वेगवेगळ्या दोन प्रकरणांत भामट्यांनी निवृत्त रेल्वे गार्ड आणि नागपूर विद्यापीठाचे निवृत्त सहायक कुलसचिव यांना टार्गेट करत एकूण १.७ कोटी रुपयांची फसवणूक केली.
आरोपींनी स्वतःला एनआयए, एटीएस आणि इतर तपास यंत्रणांचे अधिकारी असल्याचं भासवत दोन्ही पीडितांना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची आणि अटक करण्याची भीती दाखवली. सतत व्हिडिओ कॉलवर पाळत ठेवत त्यांच्याकडून बँक खात्यांमधून पैसे ट्रान्सफर करून घेतले, असा आरोप आहे.
दोन्ही प्रकरणांत सायबर पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धरमपेठ भागात राहणाऱ्या ८३ वर्षीय निवृत्त रेल्वे गार्ड यांना आरोपींनी दिल्ली बॉम्बस्फोटाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ८७.५० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. १ सप्टेंबर रोजी त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला होता. कॉल करणाऱ्यांनी स्वतःची ओळख लखनौचे एनआयए आणि एटीएस अधिकारी प्रेमकुमार गौतम आणि राहुल कुमार अशी करून दिली होती, असा आरोप आहे.
आरोपींनी वृद्ध गृहस्थांना सांगितलं की त्यांच्या नावावर असलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम कार्डद्वारे २.५० कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग व्यवहार झाले असून त्यातून त्यांना २५ लाख रुपये कमिशन मिळालं आहे, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर अटकेची धमकी देत त्यांना सतत व्हाट्सऐप व्हिडिओ कॉलवर ठेवण्यात आलं आणि घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला, असं तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींनी सुप्रीम कोर्टाच्या नावे तयार केलेला बनावट मालमत्ता जप्तीचा आदेश आणि अटक वॉरंटही दाखवल्याचा आरोप आहे.
यामुळे घाबरलेल्या वृद्ध गृहस्थांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमधून आरटीजीएसद्वारे आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये ८७.५० लाख रुपये पाठवले. तपास पूर्ण होईपर्यंत ही रक्कम आरबीआयकडे जमा राहील, अशी बतावणी आरोपींनी केली होती, असा आरोप आहे. नंतर संशय आल्यावर या वृद्ध दाम्पत्यानं सायबर हेल्पलाइन १९३० वर तक्रार नोंदवली.
नागपूर जिल्ह्यातील दुसरं प्रकरणही डिजिटल अरेस्टशी संबंधित असून त्यात नागपूर विद्यापीठाचे ७० वर्षीय निवृत्त सहायक कुलसचिव फसवणुकीला बळी पडल्याचं समोर आलं आहे. १९ सप्टेंबर रोजी त्यांना अनोळखी नंबरवरून व्हाट्सऐप मेसेज आणि व्हिडिओ कॉल आला होता.
आरोपींनी त्यांना सांगितलं की त्यांच्याविरोधात मुंबईत गंभीर फौजदारी गुन्हा दाखल असून त्यांचा संबंध दहशतवादी कारवायांशी असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यानंतर अटक वॉरंट निघाल्याची भीती दाखवत त्यांना एका खोलीत राहण्यास सांगण्यात आलं आणि सतत व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली, असा आरोप आहे.
एनआयएच्या तपासात सहकार्य न केल्यास कठोर शिक्षा होईल अशी धमकी देत आरोपींनी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला, असं तक्रारीत नमूद आहे. याच काळात आरोपींनी त्यांच्या बँक खात्याची माहिती मिळवली आणि २३ सप्टेंबर रोजी बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यातून २०.१० लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले, असा आरोप आहे. अचानक आरोपींशी संपर्क तुटल्यानं त्यांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.