राहुल गांधींचा पुतळा ॲम्ब्युलन्समधून घेऊन युवा मोर्चा नागपूरच्या मनोरुग्णालयात
भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा प्रादेशिक मनोरुग्णालयात आणून उपचारासाठी दाखल करण्याचा आग्रह धरला.
नागपुरात आज भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्या पद्धतीचे आंदोलन केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा त्यांनी ॲम्ब्युलन्समधून नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात आणला. हा पुतळा उपचारासाठी दाखल करून घ्या, असा आग्रह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाकडे धरला.
कार्यकर्ते ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलेल्या पुतळ्यासह मनोरुग्णालयाच्या परिसरात आत गेले. त्यामुळे तिथे काहीसा गोंधळ उडालेला दिसला.
आंदोलनाबद्दल युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांचे डोके जागेवर नाही. ते वारंवार संघावर, पंतप्रधान मोदींवर, निवडणूक आयोगावर आणि भाजपवर बिनबुडाचे आरोप करतात. त्यांना मानसिक उपचारांची गरज असल्याचे आमच्या डॉक्टरांनी सांगितले आहे, असेही कार्यकर्त्यांनी म्हटले. म्हणूनच त्यांना उपचारासाठी नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले जावे, ही मागणी घेऊन आणि त्यांच्या तब्येतीच्या काळजीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.
या आंदोलनामागे मुख्यमंत्र्यांचे एक वक्तव्य आहे. एसआयआरच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले होते. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे, असे म्हटले होते. त्यानंतर आज युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुतळा घेऊन मनोरुग्णालयात जाऊन आंदोलन केले.
फडणवीस नेमके काय म्हणाले होते, ते त्यांच्याच शब्दांत असे: "काँग्रेस आणि राहुल गांधी व्होट चोरी म्हणत आहेत, मात्र यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करतो की, एखादी चौकशी समिती तयार करता येईल का, जी यांचा चोरी गेलेला किंवा गहाण ठेवलेला मेंदू परत आणून देईल? तो त्यांना परत मिळेल, अशी एखादी व्यवस्था करता येईल का?"
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, निवडणूक आयोगासारख्या संविधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेचा विश्वास मिळवता येत नसल्यामुळे व्यवस्थेबद्दल अविश्वास निर्माण करण्याची रणनीती आखली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
अशा प्रयत्नांमुळे संविधानिक संस्था कमजोर होणार नाहीत, असे फडणवीस यांनी सांगितले. एसआयआरच्या प्रक्रियेबाबत निवडणूक आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे, असेही ते म्हणाले. सर्व प्रक्रिया एकमताने झाल्या आहेत. कॅबिनेट सेक्रेटरीकडे पाठवलेले पत्र कोणत्याही व्यक्तिगत विषयाशी संबंधित नाही, तर ते डेप्युटेशनवरील नियुक्तीशी संबंधित आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच फॉर्म क्रमांक ६ बाबत सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या स्वरूपातच प्रक्रिया सुरू आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.