शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

नागपुरात 'दीपसंध्या'मध्ये आशा पारेख यांच्या आठवणी आणि जुन्या गाण्यांची मैफल रंगली

कल्चर PT24 टीम

शिवाजी नगर उद्यानात शिवाजी महाराज कृती समितीच्या 'दीपसंध्या' सोहळ्यात आशा पारेख यांच्या गप्पा आणि जुन्या हिंदी गाण्यांची मैफल रंगली.

नागपूरकरांची गुरुवारची संध्याकाळ जुन्या सिनेमाच्या आठवणींनी आणि सुरेल गाण्यांनी भरून गेली. निमित्त होते शिवाजीनगर उद्यानात झालेल्या 'दीपसंध्या' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे. त्याअंतर्गत 'कुछ यादें कुछ नगमे' हा खास कार्यक्रम सादर झाला. पद्मश्री मिळालेल्या आणि दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख स्वतः हजर असल्याने रसिकांनी मोठी गर्दी केली होती आणि हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळाची झलक अनुभवली.

शिवाजी महाराज कृती समितीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. शेफ विष्णू मनोहर यांनी आशा पारेख यांच्याशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या लहानपणापासून ते चित्रपटसृष्टीतल्या यशस्वी वाटचालीपर्यंतचे अनेक किस्से बोलते केले.

नागपूरशी आपले जुने नाते आहे, असे सांगत पारेख म्हणाल्या की, त्यांच्या दोन मावश्या इथेच राहायच्या. त्यामुळे आठ-नऊ वर्षांच्या असताना त्या वारंवार नागपूरला यायच्या. पुढे आणखी दोनदा इथे येणे झाले. राजेश खन्ना यांच्या गाण्यांवर आधारित एका कार्यक्रमासाठीची भेट ही नागपुरातली आतापर्यंतची शेवटची भेट होती, असेही त्यांनी सांगितले.

लहानपणी आपण मुलांमध्येच खेळणारी, मुलांसारखीच वागणारी 'टॉमबॉय' मुलगी होतो, असे त्यांनी हसत सांगितले. शम्मी कपूर यांच्यासोबत काम करतानाचे अनुभव, मालवणी पद्धतीची फिश करी आणि आपल्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी यावरही त्यांनी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या.

जुन्या काळातले शूटिंग किती कष्टाचे होते, हेही त्यांनी उलगडले. तेव्हा रिफ्लेक्टरचा प्रकाश इतका तीव्र असायचा की डोळे दुखायचे आणि चष्मा लावावा लागायचा. मग तो लावला की लोकांना वाटायचे, हिने दारू प्यायली आहे. आउटडोअर शूटिंगला स्वच्छतागृहासारख्या साध्या सोयीही नसायच्या आणि दिवसभर अवघड परिस्थितीत काम करावे लागायचे. आता कलाकारांना व्हॅनिटी व्हॅन मिळते, असे सांगून त्यांनी तेव्हाचा आणि आताचा फरक दाखवून दिला.

'तीसरी मंजिल'मधल्या गाजलेल्या 'आजा आजा' गाण्याच्या शूटिंगची आठवणही त्यांनी सांगितली. त्या दिवशी त्यांना अ‍ॅलर्जीचा त्रास होत होता, तरी दुपारी 2 वाजताचे शूटिंग टळले नाही. औषध घेऊनही काम पूर्ण करावे लागले. कलाकाराला ताप असो किंवा तब्येत बरी नसो, काम करावेच लागते आणि म्हणूनच कलाकार हा कलाकार असतो, असे त्या म्हणाल्या.

आजच्या संगीताबद्दल बोलताना त्यांनी खंत व्यक्त केली. हिंदी सिनेसंगीतात शास्त्रीय संगीताचा प्रभाव आधीपेक्षा कमी झाला आहे. जुन्या गाण्यांमध्ये गोडवा तर होताच, पण अर्थही होता. ही समृद्ध परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. लता मंगेशकर यांची आठवण काढताना त्यांनी लतादीदींच्या अवघड आलापांचा उल्लेख केला आणि म्हणाल्या: "लताजी म्हणजे साक्षात सरस्वती होत्या. त्यांचे स्वर आत्मसात करणे सोपे नव्हते."

नागपूरकरांनी दिलेल्या प्रेमळ स्वागताने त्या भारावून गेल्या. आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे, म्हणून मराठी बोलता आलीच पाहिजे, असे त्या मराठीतच म्हणाल्या. महाराष्ट्राच्या समृद्ध साहित्यपरंपरेचे त्यांनी भरभरून कौतुकही केले. गायक निरंजन बोबडे यांच्या कामाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.

या सुरेल संध्येची कल्पना निरंजन बोबडे यांची होती. बोबडे आणि महेंद्र ढोले यांनी संगीत संयोजन केले आणि 30 कलाकारांच्या चमूने सदाबहार हिंदी गाणी सादर केली. मकरंद पाटणकर यांनी 'श्याम मस्तानी', मंजिरी वैद्य यांनी 'रात का समा', धनश्री देशपांडे यांनी 'सुनो सजना' गायले. निरंजन बोबडे यांनी 'तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है' हे गीत सादर केले, तर गौरी शिंदे यांच्या 'ओ मेरी सोना रे सोना रे'ला रसिकांची जोरदार दाद मिळाली. 'ये दुनिया वाले पूछेंगे' सारख्या युगलगीतांनी मैफलीत आणखी रंग भरला.

कार्यक्रमाच्या आयोजनात समितीचे अध्यक्ष अजय संचेती, उपाध्यक्ष संगीत चौहान आणि विनय अग्रवाल, सचिव श्रीकांत देशपांडे, सहसचिव अश्विन राऊत, कोषाध्यक्ष वंदना कुल्हार तसेच इतर सदस्यांनी मोलाची मदत केली. आमदार अभिजीत वंजारी, विलास काळे, ॲड. आनंद परचुरे, रवींद्र कासखेडीकर, संजय पेंडसे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

#नागपूर#कल्चर#PT24#Culture#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ