नागपूर काँग्रेसकडून पक्षनिधीसाठी QR कोडद्वारे क्राउड फंडिंग सुरू
पक्षाचा मासिक खर्च भागवण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने ठिकठिकाणी QR कोड लावले असून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून निधी गोळा केला जाणार आहे.
पक्ष संघटना चालवण्यासाठी आणि दर महिन्याला लागणारा खर्च भागवण्यासाठी नागपूर शहर काँग्रेस कमिटीने आता 'क्राउड फंडिंग'चा मार्ग स्वीकारला आहे. पक्षातील काही श्रीमंत नेत्यांवर अवलंबून राहण्याऐवजी सर्वसामान्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून निधी उभारण्याचा हा निर्णय नागपूर काँग्रेसने घेतला आहे.
या योजनेनुसार शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम पक्षाला देणगी म्हणून द्यावी लागणार आहे. त्याचबरोबर पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या नागरिकांनीही दर महिन्याला ऐच्छिक स्वरूपात निधी द्यावा, अशी अपेक्षा पक्षाने ठेवली आहे.
यासाठी नागपुरातील पक्षाचे मुख्यालय असलेल्या 'देवडिया काँग्रेस भवन'सह शहरातील विविध ठिकाणी खास QR कोड लावण्यात आले आहेत. एवढेच नाही तर नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांना भेटायला येणाऱ्या लोकांकडूनही याच QR कोडच्या माध्यमातून पक्ष चालवण्यासाठी निधी गोळा केला जात आहे.
काँग्रेसच्या 'संघटन सृजन' या अभियानांतर्गत नाशिकमध्ये पक्षाच्या शहर अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांसाठी झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात पक्ष नेतृत्वाने यापुढे पक्षीय खर्च भागवण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काँग्रेस विचारसरणीवर विश्वास असणाऱ्या नागरिकांची मदत घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतरच नागपुरात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या संदर्भात एबीपी माझाशी बोलताना नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील म्हणाले की, काँग्रेसमध्ये क्राउड फंडिंगची ही संकल्पना नवीन नाही. 1920 साली नागपुरात झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात खुद्द महात्मा गांधींनी 'टिळक स्वराज्य फंड' उभारला होता, अशी माहिती त्यांनी दिली. "मधल्या काळात काँग्रेस पक्ष महात्मा गांधींची जनसहभागाची ही संकल्पना विसरला होता. आम्ही याच जुन्या संकल्पनेच्या आधारे पक्षाची भविष्यातील वाटचाल करण्याचा निर्णय घेत आहोत", असं प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी सांगितलं.
काँग्रेस पक्षातील क्राउड फंडिंगचा हा इतिहास बराच जुना आहे. 26 ते 31 डिसेंबर 1920 या काळात नागपुरात झालेल्या अधिवेशनात महात्मा गांधींनी लोकमान्य टिळक यांच्या नावाने 'टिळक स्वराज्य फंड' उभारला होता. 1 ऑगस्ट 1920 रोजी टिळकांच्या निधनानंतर नागपुरात झालेल्या याच अधिवेशनात, अशा प्रकारच्या क्राउड फंडिंगमधून पक्षाने स्वातंत्र्यलढ्यासाठी लाखो रुपयांचा निधी उभा केला होता.
काही वर्षांपूर्वी काँग्रेसने ही जुनी संकल्पना सोडून दिली होती. मात्र अलीकडेच नाशिकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात पक्ष नेतृत्वाने क्राउड फंडिंगच्या या संकल्पनेकडे जिल्हाध्यक्षांचे लक्ष वेधले. त्यानंतर नागपुरात क्राउड फंडिंगचा पहिला प्रयोग सुरू झाला आहे. गोळा होणाऱ्या निधीचा हिशोब दर महिन्याला कार्यकर्त्यांसमोर मांडला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.