मुंब्र्यात छाप्यात दीड कोटींचे मेफेड्रोन जप्त; चार परदेशी नागरिक पोलिसांच्या ताब्यात
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
ठाणे पोलिसांनी मुंब्र्यातील सम्राट नगरमध्ये छापा टाकून दीड किलो मेफेड्रोन जप्त केले. तीन टांझानियन आणि एका नायजेरियन नागरिकाची चौकशी सुरू आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू आहेत. याच मोहिमेत मुंब्रा परिसरात छापा टाकून पोलिसांनी सुमारे दीड कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले असून, चार परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांच्या जाळ्याला धक्का बसला आहे.
मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सम्राट नगर भागात हरीओम बिल्डिंग आहे. तिथे काही परदेशी नागरिकांनी अंमली पदार्थांचा साठा ठेवल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी इमारतीत छापा टाकला आणि चार परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांपैकी तीन जण टांझानिया देशाचे असून एक जण नायजेरियन नागरिक आहे.
अंगझडती आणि घराची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे दीड किलो मेफेड्रोन सापडले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये आहे. मोबाईल फोन आणि कागदपत्रे धरून एकूण १ कोटी ५० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
आता पोलीस अनेक बाजूंनी तपास करत आहेत. हे परदेशी नागरिक भारतात कधी आले, कोणत्या व्हिसावर आले, त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टची मुदत संपली आहे का आणि यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का, याची तपासणी सुरू आहे. त्यांना राहण्यासाठी कोणी परवानगी (Live-in Licence) दिली आणि घराचा खरा मालक कोण आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
हे ड्रग्ज ते कुठून आणायचे आणि पुढे कोणाला देणार होते, म्हणजेच संपूर्ण बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज उघड करण्यासाठी पोलीस तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीचा (Technical & Human Intelligence) वापर करत आहेत.
ठाणे पोलिसांनी फक्त तस्करांवरच नाही, तर ड्रग्जचे सेवन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई सुरू केली आहे. मुंब्रा हद्दीत १ जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ६२५ जणांवर ड्रग्ज सेवनाबाबत कारवाई करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्या ९५० जणांवर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई झाली आहे. कारवाईसोबतच शाळा, कॉलेज आणि सामान्य नागरिकांमध्ये अंमली पदार्थांचे धोके समजावून सांगण्यासाठी जनजागृती मोहीमही राबवली जात आहे.
याशिवाय मुंब्रा परिसरातील इराणी वस्तीत गांजाची विक्री आणि साठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सव्वा किलो गांजा जप्त केला. हा गांजा ओडिशा आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यांतून बाहेरून मागवला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याचा स्रोत शोधण्याचे काम सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई ठाणे पोलीस आयुक्तालयाने स्वतंत्रपणे केली असून त्यात नवी मुंबई पोलिसांचा सहभाग नव्हता.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.