सोमवार, 26 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
AQI 270 | Poor 19:35 IST

मध्य रेल्वेवर दोन ठिकाणी बिघाड, कांजूरमार्गला रिले रूममध्ये आग; लोकल खोळंबल्या

ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड आणि कांजूरमार्ग येथे रिले रूममध्ये आग लागल्याने मध्य रेल्वेची लोकल वाहतूक विस्कळीत झाली, प्रवाशांचे हाल झाले.

मध्य रेल्वेवर दोन ठिकाणी बिघाड, कांजूरमार्गला रिले रूममध्ये आग; लोकल खोळंबल्या छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीतील मोठ्या खोळंब्याचा फटका बसला. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्याने मुंबईच्या दिशेने येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली. कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आणि काही लोकल गाड्या खूप वेळ एकाच जागी थांबून राहिल्या.

पहिला बिघाड ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान झाला. ओव्हरहेड वायरवर काहीतरी वस्तू पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. हा बिघाड दूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

दुसरी अडचण कांजूरमार्ग स्थानकात आली. तिथे लोकल सेवेवर नियंत्रण ठेवणाऱ्या रिले रूममध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास सौम्य स्वरूपाची आग लागल्याची माहिती समोर आली. त्याचा परिणाम सिग्नल यंत्रणेवर झाला आणि ती बंद पडली. त्यामुळे गाड्या जागच्या जागी थांबल्या आणि मागून येणाऱ्या लोकललाही ब्रेक लागला. या दोन्ही घटनांमुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले.

अनेक प्रवाशांना गाड्यांमध्येच बराच वेळ थांबावे लागले. वेळेत कामावर पोहोचण्याची घाई असलेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली. काही प्रवाशांनी रेल्वे रुळांवर उतरून पायी चालत पुढे जाण्याचा मार्ग निवडल्याचे दिसत आहे. केवळ संबंधित स्थानकांवरच नव्हे, तर पुढच्या मार्गांवरील लोकलच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम झाला.

सेवा कधी पूर्ववत होणार, याबद्दलही माहिती देण्यात आली. कांजूरमार्ग येथील सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करायला जास्त वेळ लागत आहे. दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंत जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याचे रेल्वे प्रशासनाचे प्रयत्न होते. धीम्या मार्गावरील सेवा रात्रीपर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.

सिग्नल यंत्रणेतील बिघाड आणि त्याच्या दुरुस्तीमुळे लोकलचे वेळापत्रक पूर्वपदावर यायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांनाही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

सायंकाळी पाचच्या सुमाराची परिस्थिती अशी होती की कसाराच्या दिशेने जाणारी लोकल विक्रोळीत थांबली होती. प्रवासी गाडीतून उतरून ट्रॅकवरून चालत होते. एकामागोमाग एक लोकल आल्याने गाड्यांची रांग लागली आणि बंचिंग झाले. गाड्यांच्या मागे गाड्या लाईनीत उभ्या दिसत होत्या. प्रवासी जीव धोक्यात घालून ट्रॅकवरून प्रवास करत होते. महिला प्रवासी आणि तरुणींना गाडीतून उतरण्यासाठी लोक मदत करताना दिसले. काही जण घाटकोपरवरून ट्रॅकवरून चालत आले.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ