महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत शेठ करमशी कानजी शाळेचा केवल कुळकर्णी विजेता
आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या वतीने एमएससी बँकेच्या पुरस्काराने मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेत शेठ करमशी कानजी इंग्लिश स्कूलचा केवल कुळकर्णी विजेता ठरला.
अंतिम फेरी आठव्या डावापर्यंत गेली आणि ती अटीतटीची झाली. या डावात उमैर पठाणने मध्यापर्यंत 10-0 अशी मोठी आघाडी घेतली होती. एवढी आघाडी असूनही केवलने शेवटच्या क्षणी अचूक खेळ करत डावाचं चित्र पालटलं आणि 11-10 असा विजय मिळवला. उपांत्य फेरीपर्यंत सहज विजयी वाटचाल करणाऱ्या श्री नारायण गुरु हायस्कूलच्या उमैर पठाणला या पराभवामुळे अंतिम फेरीत उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं.
बक्षीस वितरण समारंभाला अनेक मान्यवर हजर होते. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, नगरसेवक महादेव शिवगण, डॉ. जितेंद्र लिंबकर, विष्णू तांडेल, प्रकाश वाघमारे, अशोक नवले, प्रमोद पार्टे, जनार्दन मोरे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आलं. विजेत्यांना आकर्षक चषकासह टी शर्ट, स्ट्रायकर आणि भेटवस्तू असे पुरस्कार देण्यात आले.
मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांतील शाळांचे तब्बल 200 कॅरमपटू या स्पर्धेत उतरले होते. दादरच्या सिबिईयु सभागृहात उपांत्य फेरीचे सामने झाले. या फेरीत केवल कुळकर्णीने शिवांश मोरेला 13-8 असं हरवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर उमैर पठाणने सोहम जाधवला 9-3 असं नमवून अंतिम फेरी गाठली होती.
स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्यांमध्ये शारदाश्रम विद्या मंदिरचा सोहम जाधव आणि आयईएस चंद्रकांत पाटकर स्कूल-डोंबिवलीचा शिवांश मोरे यांचा समावेश होता. याआधी उपांत्यपूर्व फेरीत बाहेर पडलेल्या खेळाडूंमध्ये महात्मा गांधी विद्यामंदिरची तनया दळवी, पार्ले टिळक विद्यालयाचा जयेश कांबळे, होली फॅमिली हायस्कूलचा चैतन्य पोमेंडकर आणि महिला मंडळ शाळेचा विराज बर्वे यांचा समावेश होता. या सगळ्यांसह विविध गटांतून एकूण 32 खेळाडूंना पुरस्कार देण्यात आले.
या स्पर्धेच्या आधी मुंबईतील पाच वेगवेगळ्या विभागांत तज्ज्ञ राष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सराव आणि पूर्वतयारी उपक्रम राबवण्यात आला होता, जेणेकरून सहभागी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयारी करता यावी. स्पर्धेचं पंच म्हणून काम संतोष जाधव, चंद्रकांत करंगुटकर आणि ओमकार चव्हाण यांनी पाहिलं.