गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
21:08 IST

मुंबई आणि रायगडमध्ये शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा, यलो अलर्ट जारी

हवामान विभागाने शुक्रवारी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हंगामातील पहिल्या उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तापमान ३५ अंशांच्या जवळ पोहोचले असून उकाडा वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि रायगडमध्ये शुक्रवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा, यलो अलर्ट जारी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

पावसाने दडी मारल्यानंतर राज्यातील वातावरणात कमालीचा बदल दिसू लागला आहे. मान्सून गायब झाल्यामुळे तापमानात अचानक वाढ झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत हंगामातील पहिली उष्णतेची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी शुक्रवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तापमान वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतही हवामान अतिशय उष्ण आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. या भागातील काही निवडक ठिकाणी नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मान्सून निघून गेल्यामुळे महाराष्ट्रातील हवामानाचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. तापमान वाढले आहे आणि हवेतील आर्द्रताही वाढली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उकाड्याचा त्रास वाढला असून लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. राज्यातील बऱ्याच भागांतील हवामान पूर्णपणे कोरडे पडले आहे. फक्त तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता उरली आहे. म्हणजेच यंदाचा ऑक्टोबर महिना डोक्याला ताप देणार, हे आता निश्चित झाले आहे.

सध्या मुंबईसह कोकणपट्ट्यातील अनेक ठिकाणी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचले आहे. स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांच्या मते, मान्सूनच्या परतीच्या काळात महाराष्ट्रात पावसाची शक्यता अत्यंत नगण्य आहे. सध्या पाकिस्तानच्या भागातून भारताच्या दिशेने पश्चिमी वाऱ्यांचे प्रवाह तयार होत आहेत, तर दक्षिण भारतात पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अरबी समुद्र आणि जवळच्या परिसरातील वाऱ्यांचा प्रवाह बदलल्यामुळे महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान तयार झाले आहे. देशात एकीकडे काही भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे काही भागांत तीव्र उष्णतेची लाट जाणवत आहे. झारखंड आणि बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे हवामानाचा हा संपूर्ण पॅटर्न बदलला आहे.

नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी दिवसभरात भरपूर पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा फळांचा रस प्यावा. दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय थेट सूर्यप्रकाशात फिरणे टाळावे.

घराबाहेर पडताना सुती म्हणजे कॉटनचे आणि हलक्या रंगाचे कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री घ्यावी. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना उष्णतेचा त्रास लवकर होऊ शकतो, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ