मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात आदित्य ठाकरे यांची चौकशी करा, शीतल म्हात्रे यांची मागणी
दिनो मोरियाला अटक झाल्यानंतर शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची आणि कोविड काळातील कंत्राटांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.
मिठी नदीतील गाळ उपशात झालेल्या ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्यात अभिनेता दिनो मोरिया याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. या पार्श्वभूमीवर उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली आहे. मुंबईतील बाळासाहेब भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
म्हात्रे यांच्या म्हणण्यानुसार आदित्य ठाकरे आणि दिनो मोरिया यांचे व्यावसायिक संबंध आहेत. कोविड काळात मुंबई महापालिकेतून जी कंत्राटे दिली गेली, त्यांची श्वेतपत्रिका काढावी, अशीही मागणी त्यांनी या वेळी पत्रकार परिषदेत केली.
म्हात्रे यांनी सांगितले की, दिनो मोरियाची अटक म्हणजे मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील हिमनगाचे टोक आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या घोटाळ्याशी मोरियाचा मित्र आदित्य ठाकरे यांचा थेट संबंध आहे. मोरिया आणि आदित्य हे खास मित्र आहेत, हे सर्वांना माहीत आहे, असे त्या म्हणाल्या. आदित्य महापालिकेत नगरसेवक असताना मोरिया महापालिकेत वारंवार यायचा, असेही त्यांनी सांगितले. तसेच मोरिया आणि कंत्राटदार केतन कदम हे पार्टनर असल्याचे संभाषणातून सिद्ध झाले आहे, असा दावा त्यांनी केला.
दिनो मोरिया आणि आदित्य ठाकरे यांची प्रत्येक कॉन्ट्रॅक्टमध्ये कमिशन घेणारी वसुली गँग आहे, असा खळबळजनक आरोप म्हात्रे यांनी केला. कोविड काळातील खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा आणि ऑक्सिजन प्लॅन्टसारख्या कॉन्ट्रॅक्टची सखोल चौकशी व्हावी आणि त्यानंतर श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे केली.
म्हात्रे यांनी दिशा सालियन प्रकरणाचाही उल्लेख केला. दिशा सालियन हत्या प्रकरणात दिनो मोरियाचे नाव आहे, असे त्या म्हणाल्या. मिठी नदी घोटाळा असो किंवा दिशा सालियन हत्याकांड, दोन्हीकडे मोरियाचे नाव पुढे येत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याच्या मोबाईलमधील चॅट आणि कॉल डेटा जनतेसमोर यायला हवा, त्यातून अनेक गोष्टींचा उलगडा होईल, असे त्यांनी सांगितले.
दिनो मोरियाची ज्या प्रकारे चौकशी सुरू आहे, त्याच प्रकारे आदित्य ठाकरे यांचीही आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी मागणी म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली. यासंदर्भात शिवसेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र दिले जाईल, असेही म्हात्रे म्हणाल्या. ठाण्यातील प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचा पोलीस तपास करत आहेत, आणि या तपासातून सत्य समोर येईल, असे त्यांनी सांगितले.