सोमवार, 19 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
20:56 IST

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढचे पाच दिवस पावसाचा इशारा, सोलापुरात ३७.९ अंश

हवामान विभागाने कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज दिला आहे, तर उरलेल्या राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार आहे.

कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढचे पाच दिवस पावसाचा इशारा, सोलापुरात ३७.९ अंश छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत

राज्यात सध्या एका बाजूला ऑक्टोबर हिटचा प्रचंड चटका बसत आहे आणि घामाच्या धारा लागत आहेत. अशातच हवामानात थोडा दिलासा देणारा बदल दिसू लागला आहे. काही निवडक भागांत पावसाच्या सरी पुन्हा एकदा येऊन गेल्या आहेत.

हवामानशास्त्र विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आजपासून पुढचे काही दिवस कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. उरलेल्या महाराष्ट्रात मात्र उन्हाचा चटका तीव्र जाणवत राहणार आहे.

आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. धुळे, नाशिक घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडू शकतात.

उद्या, म्हणजे मंगळवारी २० ऑक्टोबरला कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथा जिल्ह्यांत वादळी पावसाचा विशेष इशारा आहे. रत्नागिरी, सातारा घाटमाथा, सातारा, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विजांसह हलक्या सरी कोसळतील. त्याच दिवशी रायगड, पुणे, सातारा, बीड आणि परभणी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि साताऱ्याच्या घाट परिसरातही वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पुढच्या तीन दिवसांचा अंदाजही दिला आहे. बुधवारी ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत गडगडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. गुरुवारी कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गात विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी येतील. शुक्रवारी कोल्हापूर घाटमाथा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

तापमानाकडे पाहिले तर राज्यात बहुतांश ठिकाणी पारा ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. गेल्या २४ तासांत सोलापूरमध्ये सर्वाधिक ३७.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात लोकांना सध्या तीव्र उष्णता आणि असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तरीही हवामानातील या बदलामुळे २० ऑक्टोबरच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या भागातही पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही भागांतही पुढच्या काळात पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित अंदाजानुसार, २२ ते २९ ऑक्टोबर दरम्यान कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. २९ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात दक्षिण भारतासह महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्षात किती पाऊस पडेल आणि कुठे पडेल, हे पूर्णपणे हवामान प्रणालीच्या हालचालींवर अवलंबून असेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ