महानगर गॅस ग्राहकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
बनावट बिल मेसेज, एपीके लिंक आणि फोन कॉल्सद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत कंपनीने ग्राहकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.
महानगर गॅस लिमिटेड म्हणजेच एमजीएलने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. गॅस बिलाचे अपडेट्स किंवा गॅस पुरवठा लगेच बंद करण्यात येणार असल्याचा दावा करणारे एसएमएस आणि व्हाट्सऐप मेसेज तसेच कॉल्स सध्या फिरत आहेत. यामध्ये फसवणुकीच्या लिंक, धोकादायक एपीके फाइल्स डाउनलोड करायला लावणे आणि कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून संपर्क साधणे असे प्रकार होत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. या सगळ्यापासून ग्राहकांनी सावध राहावे, असे आवाहन एमजीएलने केले आहे.
अलीकडच्या काळात महानगर गॅसच्या अनेक ग्राहकांना सायबर भामट्यांनी वारंवार फसवल्याचे समोर आले आहे. गॅस बिलाचे बनावट अपडेट्स आणि गॅस पुरवठा बंद होणार असल्याचे मेसेज नेहमीच या भामट्यांकडून ग्राहकांना पाठवले जातात. त्यानंतर संशयास्पद लिंकवर क्लिक करायला लावणे, एपीके फाइल डाउनलोड करायला भाग पाडणे किंवा संवेदनशील माहिती विचारणे असे प्रकार घडत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
सायबर भामटे वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून वेगवेगळ्या पातळीवर हे घोटाळे करत असतात. ग्राहकांनी संवेदनशील माहिती उघड करावी किंवा त्यांच्या मोबाइल-डिव्हाइसवर मालवेअर इन्स्टॉल व्हावे यासाठी हा सगळा सापळा रचलेला असतो. त्यामुळे अशा घटनांबाबत दक्ष राहावे आणि फसव्या मेसेजना अजिबात प्रतिसाद देऊ नये, असे महानगरने स्पष्ट केले आहे. कोणताही संशयास्पद मेसेज किंवा कॉल आला तर आधी एमजीएलच्या अधिकृत चॅनेलवरून थेट संपर्क साधून त्याची खातरजमा करावी, अशी विनंती कंपनीने केली आहे.
एखाद्या मेसेजबाबत शंका आल्यास ग्राहकांनी तातडीने (022) 68674500 किंवा (022) 61564500 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महानगरने केले आहे. व्हॉट्सअॅपवर बोलण्यासाठी एमजीएलचा अधिकृत क्रमांक +91 98992 03843 हा आहे, त्यावरही ग्राहक संपर्क करू शकतात. बनावट कॉल किंवा मेसेजची माहिती राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक 1930 वर द्यावी किंवा www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवावी, असेही कंपनीने सांगितले.
एमजीएलने स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांचे प्रतिनिधी कधीही फोन कॉल, एसएमएस किंवा व्हाट्सऐप मेसेजच्या माध्यमातून ओटीपी, कार्ड क्रमांक, पासवर्ड किंवा तत्सम व्यक्तिगत आर्थिक माहिती विचारत नाहीत. तसेच एपीके फाइल डाउनलोड करायला किंवा अनोळखी वा संशयास्पद लिंकवर क्लिक करायला कधीही सांगत नाहीत. सायबर भामट्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी विविध कंपन्यांसह केंद्र व राज्य सरकारही प्रयत्न करत असून त्यासंदर्भात जनजागृतीही केली जात आहे. तरीही काही नागरिक अजूनही अशा फसवणुकीला बळी पडत असल्याचे दिसते. अशा वेळी त्यांनी तातडीने सायबर गुन्हे कक्षाकडे किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार करावी, असे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले आहे.