बुधवार, 4 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात सौरभ चंद्राकरला आठ दिवसांची सीबीआय कोठडी

महादेव बेटिंग अॅप प्रकरणात सौरभ चंद्राकरला आठ दिवसांची सीबीआय कोठडी छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
क्राइम PT24 टीम

रायपूरमधील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बुधवारी (४ नोव्हेंबर) सौरभ चंद्राकरला ८ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. त्याला १२ नोव्हेंबरला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत.

महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप घोटाळ्यातील (Mahadev Betting App Scam) मुख्य आरोपी सौरभ चंद्राकर याला रायपूर येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ८ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. बुधवारी (ता. ४) झालेल्या सुनावणीत हा निर्णय झाला. आता चौकशीसाठी चंद्राकरला दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात नेणार असून, १२ नोव्हेंबरला त्याला पुन्हा न्यायालयात हजर करणार आहेत.

सुनावणीच्या वेळी अंमलबजावणी संचालनालयाचे (ED) अधिकारी आणि वकीलही हजर होते. ईडीनेही चंद्राकरच्या कोठडीची मागणी केली आहे. मात्र चंद्राकरचे वकील तुषार गिरी यांनी सीबीआयच्या रिमांड याचिकेला विरोध केला. ही याचिका अनुचित असल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीमुळे न्यायालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या कथित ऑनलाइन सट्टेबाजी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या चंद्राकरला सीबीआयने मंगळवारी दिल्लीहून रायपूरला आणले. ओमानमधून प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारे त्याला भारतात आणले गेले. त्याआधी सोमवारी दिल्लीतील राऊज अॅव्हेन्यू न्यायालयाने त्याला दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर सीबीआयच्या ताब्यात दिले होते.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला भारतात आणल्याचे सांगितले. सीबीआयच्या चौकशीत आणखी काही नावे समोर येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. पक्षाने स्वतःच्या हितासाठी लोकशाही कमकुवत केल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी पत्रकार परिषदेत सहआरोपी रवी उप्पल आणि शुभम सोनी अजूनही फरार असल्याचा दावा केला. शुभम सोनी कुठे आहे, असा सवालही त्यांनी विचारला. २०२३ च्या निवडणुकीत महादेव अॅपशी संबंधित व्हिडिओ त्यानेच प्रसिद्ध केला होता, असे बैज म्हणाले. मागील काँग्रेस सरकारच्या काळात या प्रकरणात ७२ हून अधिक एफआयआर दाखल झाल्या होत्या, तसेच अनेक छापे टाकून अटकसत्रही राबवले होते, असा दावा त्यांनी केला.

चंद्राकरच्या वकिलांनी याआधी त्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले होते. ओमानच्या न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत, भारताच्या विनंतीला फक्त ईडीच्या प्रकरणात मंजुरी मिळाली होती, सीबीआयच्या प्रकरणात नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. त्यामुळे ज्या प्रकरणांच्या आधारे प्रत्यार्पण झाले, त्याच प्रकरणांत कारवाई करता येईल, असे वकिलांचे म्हणणे आहे.

महादेव बेटिंग अॅपशी संबंधित प्रकरणांचा तपास सीबीआय करत आहे. छत्तीसगड सरकारने या प्रकरणातील १३ एफआयआर सीबीआयकडे सोपवल्या होत्या. त्यांपैकी दोन प्रकरणांत आरोपपत्रही दाखल झाले आहे. ईडी मनी लॉन्ड्रिंगच्या दृष्टीने स्वतंत्र तपास करत असून, सौरभ चंद्राकरविरोधात अभियोजन तक्रार दाखल केली आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महादेव अॅपचा प्रचार केला. ऑनलाइन सट्टेबाजीसाठी अनेक प्लॅटफॉर्म तयार केले आणि त्यातून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांमार्फत संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवला.

सौरभ चंद्राकर २०२३ पासून दुबईत फरार होता. त्याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. ८ जुलै रोजी ओमानच्या रॉयल पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर ११६ दिवसांनी, १ नोव्हेंबर रोजी त्याला भारतात आणले गेले.

#नागपूर#जुर्म#PT24#Crime#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ