भारतातील थंड वाळवंट, जिथे तापमान उणे ३५ डिग्रीपर्यंत जाते, जाणून घ्या हे ठिकाण नेमकं कुठे आहे
राजस्थानच्या उष्ण वाळवंटाच्या अगदी उलट, भारतात एक थंड वाळवंटही आहे जिथे हिवाळ्यात तापमान उणे ३५ डिग्री सेल्सियसपर्यंत खाली जातं.
राजस्थानचं नाव ऐकलं की डोळ्यासमोर येते ती उष्ण हवा आणि पसरलेलं वाळवंट. थर वाळवंट सोनेरी वाळू, उंच वाळूचे ढिगारे आणि भाजून काढणाऱ्या उष्णतेसाठी जगभर ओळखलं जातं. राजस्थानच्या अनेक भागात वाळूचा विस्तीर्ण प्रदेश आणि कडक ऊन दिसतं. उन्हाळ्यात तापमान इतकं वाढतं की दिवसा वाळू तापून त्यावरुन चालणंही कठीण होऊन बसतं. पण वाळवंटात उष्ण वाऱ्यांऐवजी थंड बर्फाळ वारे अनुभवायला मिळतील असं सांगितलं तर पटेल का? असं वाळवंट भारतातच आहे, आणि ते राजस्थानच्या या ओळखीपेक्षा अगदी उलट आहे.
भारतातलं हे थंड वाळवंट प्रत्यक्षात लडाखच्या लेह जिल्ह्यात वसलेलं आहे. हा परिसर समुद्रकिनाऱ्यापासून ३००० ते ३५०० मीटर उंचीवर आहे, म्हणजेच अनेक ठिकाणी याची उंची १०,००० ते ११,५०० फुटांहून जास्त भरते. जास्त उंची, अत्यंत कमी पाऊस आणि थंड हवामान यामुळे इथला भूगोल राजस्थानच्या उष्ण वातावरणापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. इथे सोनेरी वाळूसोबतच दगडी डोंगर, कोरडी खोरी आणि ओसाड जमिनीचे विस्तीर्ण प्रदेश पाहायला मिळतात. वाळवंट म्हटलं की उष्णता हे समीकरण असतं, पण लेहचं हे वाळवंट त्याला अपवाद ठरतं.
या वाळवंटाला 'थंड वाळवंट' का म्हणतात, याचं कारण इथलं वेगळं वातावरण आहे. भव्य हिमालय पर्वतरांगांच्या मागे वसलेल्या या उंच पर्वतरांगांमुळे मान्सूनचे वारे इथपर्यंत पोहचू शकत नाहीत, त्यामुळे पावसाचं प्रमाण फार कमी असतं. इथे उन्हाळाही फार काळ टिकत नाही. हिवाळ्यात परिस्थिती अधिकच तीव्र बनते आणि इथला गारठा कधीकधी सहन होण्यापलीकडचा ठरतो. या काळात इथलं सरासरी तापमान उणे २० ते उणे ३५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचतं, अशी माहिती आहे. पावसाळ्यात पावसाची कमतरता आणि जास्त थंडी यामुळे इथे हिरवळही फार कमी दिसते. त्यामुळेच हा प्रदेश खडकाळ डोंगर, कोरडी जमीन आणि वाळवंटानं भरलेला असतो. एकाच वेळी उंच पर्वत, कोरडं हवामान आणि प्रचंड थंडी असं संमिश्र चित्र इथे पाहायला मिळतं.
लेह हा जिल्हा नैसर्गिकरित्या सुंदर असून इथे इतिहास आणि संस्कृतीची वेगळी झलक पाहायला मिळते. इथलं पांगोंग त्सो सरोवर सुंदरतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर असून वातावरणातील प्रकाशानुसार पाण्याचा रंग बदलत राहतो. याशिवाय लेह पॅलेस, हेमिस मठ, थिक्से मठ आणि दिस्किट मठ ही काही प्रमुख ठिकाणं असून तिथे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणांना भेट देऊन लडाखमधील धार्मिक आणि बौद्ध संस्कृती जवळून जाणून घेता येते. थंड वाळवंटासोबतच सरोवर आणि मठांची ही विविधता लेहला वेगळं पर्यटनस्थळ बनवते.