मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
17:34 IST

कुंडलीतला दोष घालवायच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार; लातूरमध्ये महाराजाला अटक

कुंडलीतला दोष घालवायचा असल्याचं सांगून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप एका तथाकथित महाराजावर झाला असून, मुलगी गर्भवती असल्याचं समोर आल्यावर हे प्रकरण उघडकीस आलं.

लातूरमध्ये एका धक्कादायक घटनेत, कुंडलीतला दोष घालवायचा असल्याचं सांगून एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप एका तथाकथित महाराजावर झाला आहे. या मुलीच्या पोटात दुखायला लागलं म्हणून तिला उपचारासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती गर्भवती असल्याचं समोर आलं आणि तेव्हाच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.

याबाबत विवेकानंद पोलीस स्टेशनला रामेश्वर हणमंतराव रामदासी उर्फ रामेश्वर महाराज (वय 45) याच्याविरोधात पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून कोर्टात हजर केलं, तेव्हा कोर्टानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी गेली अनेक वर्षं एका आडतीवर पूजापाठ करायला जायचा. आडतीवरच्या याच येण्याजाण्यादरम्यान त्याची ओळख पीडित मुलीच्या वडिलांशी झाली. दोघांमधली ओळख हळूहळू वाढत गेली आणि त्यातूनच आरोपीचं या कुटुंबाच्या घरी येणंजाणं सुरू झालं. पुढे मुलीच्या कुंडलीत दोष असल्याचं सांगण्यात आलं आणि हा दोष घालवायला खास पूजा करावी लागेल, असं सांगून आरोपीनं कुटुंबाचा विश्वास संपादन केल्याचा आरोप आहे.

जूनपासून आरोपी याच पूजेच्या निमित्तानं मुलीच्या घरी वारंवार यायला लागला होता, असं पोलिसांच्या फिर्यादीत म्हटलं आहे. याच काळात त्यानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असून, हे प्रकरण बराच काळ कुटुंबीयांच्या लक्षातच आलं नव्हतं, असंही फिर्यादीत नमूद आहे. पुढे मुलीला पोटदुखीमुळे रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा डॉक्टरांच्या तपासणीत ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं आणि वैद्यकीय-कायदेशीर नोंदीच्या आधारे या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली.

वैद्यकीय अहवाल आणि मिळालेल्या माहितीनंतर विवेकानंद पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आणि रामेश्वर महाराजला अटक केली. पोलिसांच्या माहितीप्रमाणे आरोपी गेली जवळपास 30 वर्षं पूजापाठाचं काम करतो आणि याशिवाय शहरातल्या एका नामांकित देवस्थानात पुजारी म्हणूनही काम करतो, असं समोर आलं आहे.

कुंडलीतला दोष घालवण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप असल्यानं या प्रकरणाची विविध अंगांनी चौकशी सुरू आहे. आरोपीनं याआधी अशाच प्रकारे आणखी कोणासोबत हे केलं आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. लातूर शहराचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जाईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे या तपासात आणखी काही समोर येतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ