लातूरच्या माऊलीनगरमधील फ्लॅटवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसायप्रकरणी दोघांना अटक
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने अंबिका निवासमधील फ्लॅटवर छापा टाकून दोघांना अटक केली आणि एका महिलेची सुटका केली. एक आरोपी पळून गेला आहे.
लातूर शहरातील माऊलीनगर भागात भाड्याने घेतलेल्या एका फ्लॅटमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने या फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली असून एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. दोन हजार रुपयांची रोकड आणि दोन कंडोमची पाकिटेही पोलिसांनी जप्त केली.
आर्थिक फायद्यासाठी लातूर शहरात महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने माऊलीनगरमधील अंबिका निवास येथील फ्लॅटवर कारवाई केली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी जावेद सय्यद हा रूपाली माळी हिने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये लातूर शहरातील तसेच बाहेरच्या जिल्ह्यांतील महिलांना बोलावून घेत असे. त्यांना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे पोलिसांना कळले होते. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलीस निरीक्षक विठ्ठल शिवाजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सापळा रचला.
शुक्रवारी सायंकाळी ४.५५ वाजता अंबिका निवासच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २ मध्ये पोलिसांनी छापा टाकला. त्या वेळी जावेद युसुफ सय्यद (वय ३३, रा. करीम नगर, लातूर) आणि जयश्री राम तोरडे (वय ४०, रा. प्रकाश नगर, लातूर) हे दोघे तिथे आढळले. एक महिला वेगळ्या खोलीत होती. पोलिसांनी बनावट ग्राहकाला दिलेले दोन हजार रुपये जावेद सय्यदकडे सापडले. फ्लॅटमधून दोन कंडोमची पाकिटेही जप्त करण्यात आली. पोलिसांनी त्या महिलेकडे विचारपूस करून तिची सुटका केली.
तपासात विष्णू ऊर्फ वैभव हनुमंत पुरी (रा. कवळी, ता. औसा, जि. लातूर) याचाही यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. मात्र तो घटनास्थळावरून पळून गेला. फ्लॅट भाड्याने घेणारी रूपाली माळी हिचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे तपासात पुढे आले असून, याबाबत शिवाजीनगर पोलिस पुढील कार्यवाही करत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि पोलिस उपअधीक्षक डॉ. भागीरथी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजिनाथ पाटील, महिला पोलीस अमलदार सुधामती वंगे, सदानंद योगी, लता गिरी आणि सचिन मुंडे हे कारवाईत सहभागी होते.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.