भारत-वेस्ट इंडिज पहिल्या टी 20 सामन्यावर पावसाचे सावट, लखनऊमध्ये उद्या सामना
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील 5 टी 20 सामन्यांची सिरिज उद्या, म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या सिरिजमधला पहिला सामना लखनऊ येथील 'भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम'वर संध्याकाळी ७ वाजता खेळवला जाणार आहे. त्याआधी संध्याकाळी ६:३० वाजता टॉस होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे.
वेस्ट इंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये नुकतीच वनडे सिरिज झाली. त्या सिरिजमध्ये भारताने 2-1 ने विजय मिळवला, पण शेवटच्या सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. वनडे सिरिज संपल्यानंतर आता दोन्ही संघ टी 20 सिरिज खेळणार आहेत, आणि त्यातला पहिला सामना उद्या होणार आहे.
लखनऊमध्ये उद्या दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान पावसाच्या सरी कोसळू शकतात. संध्याकाळच्या वेळी पाऊस पडला, तर टॉस होण्यास आणि सामना सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. त्यामुळे सामना काही काळासाठी थांबवावा लागण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणूनच उद्याच्या सामन्यावर पावसाचे सावट दिसत आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल दिसत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शहरात १० ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पुढील काही दिवसांत पावसाची शक्यता अशी आहे: मंगळवारी ६८ टक्के, बुधवारी ७० टक्के, गुरुवारी ६० टक्के, शुक्रवारी ६८ टक्के आणि शनिवारी ५५ टक्के.
लखनऊ येथील या स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीसाठी उपयुक्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र ही खेळपट्टी संथ राहते आणि फिरकी गोलंदाजांना जास्त अनुकूल ठरताना दिसली आहे. नव्या चेंडूने सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सामना पुढे सरकेल तशी खेळपट्टी आणखी संथ होऊ शकते, त्यामुळे या स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करणे जास्त योग्य ठरू शकते.