शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट

कोण होणार करोडपतीच्या मंचावर डिलिव्हरी बॉयची आईला साद, माधुरी दीक्षितही भावूक

PT24 टीम

डिलिव्हरी बॉय जगदीश कांबळे यांनी हॉट सीटवर बसून आपला संघर्ष सांगितला आणि आईला परत येण्याची हाक दिली.

सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर जगदीश कांबळे या डिलिव्हरी बॉयनं आपली कहाणी सांगितली आणि सगळ्यांची मनं जिंकली. मोठी स्वप्नं पूर्ण करायला परिस्थिती नाही, तर जिद्द लागते, हेच त्यांनी दाखवून दिलं. हा भाग फक्त एका स्पर्धकाचा राहिला नाही. एका लेकरानं मंचावरून आपल्या आईला मारलेली आर्त हाक म्हणून तो लक्षात राहिला.

'कोण होणार करोडपती'मध्ये यायचं, माधुरी दीक्षित यांना भेटायचं आणि त्यांच्यासमोर हॉट सीटवर बसायचं, हे जगदीश यांचं स्वप्न होतं. त्या खास दिवसासाठी त्यांनी मित्राकडून अडीच हजार रुपये उधार घेतले. त्यातून चारशे रुपयांचा शर्ट, हजार रुपयांची पॅण्ट आणि हजार रुपयांचे बूट घेतले. पण या कपड्यांवर ते बूट काही जुळत नव्हते. म्हणून त्यांना रोज वापरतात ती सॅन्डल घालूनच यावं लागलं. ही सॅन्डलसुद्धा फाटलेली आहे, असं त्यांनी अगदी प्रामाणिकपणे सांगून टाकलं.

त्यांचा साधाभोळा स्वभाव आणि हे मोकळं बोलणं ऐकून माधुरी दीक्षित यांच्यासह मंचावरच्या सगळ्यांचंच मन हेलावलं.

जगदीश यांच्या संघर्षाची गोष्ट एवढ्यावरच संपत नव्हती. गप्पा सुरू असताना त्यांच्या आयुष्यातला एक खूप वेदनादायी भाग समोर आला. वडिलांच्या त्रासामुळे त्यांची आई त्यांना आणि घरच्यांना सोडून निघून गेली होती. आई गेल्यापासून आयुष्यात जी पोकळी तयार झाली, तिची उणीव आपल्याला प्रत्येक क्षणी जाणवते, असं ते म्हणाले.

हॉट सीटवर बसून आईची आठवण काढताना जगदीश अत्यंत भावूक झाले. डोळ्यांत पाणी आणून ते म्हणाले, "आज जर माझी आई सोबत असती, तर माझ्या छातीवर तीन स्टार असते..." त्यानंतर थेट कॅमेऱ्याकडे बघत त्यांनी आईला साद घातली, "आई, तू कुठेही असशील आणि हा कार्यक्रम पाहत असशील तर परत ये, मी तुला काही विचारणार ना, काही बोलणार नाही..." त्यांच्या या हाकेनं मंचावर एकदम शांतता पसरली आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन हेलावलं.

माधुरी दीक्षित यांनी जगदीश यांचा साधेपणा, त्यांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची जिद्द यांचं कौतुक केलं. 'कोण होणार करोडपती' हा नुसता प्रश्नोत्तरांचा खेळ नाही. सामान्य माणसांची स्वप्नं, त्यांच्या वेदना आणि भावना मांडायला हक्काचं व्यासपीठ देणारा हा मंच आहे, हे या भागानं पुन्हा एकदा दाखवून दिलं. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर पाहायला मिळतो.

#नागपूर#PT24#Nagpur

जाहिरात

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही 'तुम्ही' वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ