कोल्हापुरात सहा लाखांच्या कर्जासाठी अडीच कोटी देऊनही तगादा, सावकारीच्या आरोपावरून तिघांना अटक
अभियंता महिलेच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापुरात खासगी सावकाराकडून घेतलेल्या सहा लाख रुपयांच्या कर्जापोटी एका अभियंता महिलेने अडीच कोटी रुपयांहून जास्त रक्कम दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढी रक्कम दिल्यानंतरही पैशांसाठी तगादा सुरूच राहिल्याचा आरोप या महिलेने केला आहे.
गीता स्वप्नील मोरे (वय ३२, रा. सोनाळी, ता. करवीर; सध्या चिंतामणी पार्क, क्रांतीसिंह नाना पाटीलनगर) असे फिर्यादी अभियंता महिलेचे नाव आहे. त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी सिद्धेश मिलिंद गायकवाड (वय २४), अजिंक्य संभाजी जाधव (२५) आणि स्वाती सुनील सिन्नर (२३, सर्व रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांना व्यवसायासाठी पैशांची गरज होती. म्हणून त्यांनी २९ सप्टेंबर २०२१ रोजी खासगी सावकार सिद्धेश गायकवाड याच्याकडून सहा लाख रुपये घेतले. या रकमेवर दरमहा १० टक्के व्याज द्यायचे ठरले होते. मुद्दल आणि व्याज वेळेत परत न केल्यास सहा लाखांच्या बदल्यात १२ लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट घातल्याचा आरोप आहे.
आर्थिक अडचणींमुळे मोरे यांना वेळेत परतफेड करता आली नाही. त्यानंतर गायकवाड याने १२ लाख रुपयांसाठी तगादा लावायला सुरुवात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
वसुलीसाठी गायकवाड याने स्वप्नील जाधव, बल्ली भाई आणि अजित तिवडे यांच्या नावाने धमक्या दिल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारू, अशी धमकी देण्यात आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. मोरे यांच्या आईला आणि इतर नातेवाइकांना फोन करूनही पैशांसाठी तगादा लावण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याच काळात त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
सततच्या धमक्यांमुळे घाबरून मोरे यांनी नातेवाइकांचे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवून पैसे उभे केले आणि वेळोवेळी सावकाराला रक्कम परत केली. अखेर २ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी २ कोटी ५२ लाख ५४ हजार ९२२ रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तरीही पैशांसाठी तगादा थांबला नाही, असा आरोप आहे. सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून मोरे यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली.
फिर्यादीनुसार, गायकवाड याने स्टॅम्पवर नोटरी करून घेतल्यानंतर मोरे यांचे सोन्याचे दागिने, चेक आणि एटीएम कार्ड ताब्यात घेतले. त्यांच्या बँक खात्यात जमा होणारी रक्कम एटीएमच्या मदतीने परस्पर काढून घेतल्याचाही आरोप आहे. सोनाराकडे गहाण ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही परस्पर सोडवून घेतल्याचे मोरे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणात सिद्धेश गायकवाड, अजिंक्य जाधव आणि स्वाती सिन्नर यांच्यासह स्वप्नील जाधव (लाला शेठ), सरिता मिलिंद गायकवाड, तेजस चंद्रकांत माने, गायत्री अजिंक्य साळोखे-गायकवाड आणि अजिंक्य अशोक साळोखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. करवीर पोलीस पुढील तपास करत आहेत.