ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पक्षाची मागणी; ४८ तासांचा अल्टिमेटम
कॉकरोच जनता पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर थेट देशद्रोहाचा आरोप करत ४८ तासांत राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
दिल्लीत झालेल्या एका पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पक्षाचे (सीजेपी) प्रमुख अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. ज्ञानेश कुमार हे देशातील सर्वात मोठे देशद्रोही असून त्यांनी लगेच राजीनामा द्यायला हवा, अशा शब्दांत दिपके यांनी संताप व्यक्त केला. ज्ञानेश कुमार हे भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका असल्याचंही त्यांनी सांगितलं.
निवडणूक आयोगातील तीनही निवडणूक आयुक्तांमध्ये मतभेद असल्याचं समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. यातच ज्ञानेश कुमार यांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे दिपके यांनी ही आक्रमक भूमिका घेतली आहे.
दिपके यांनी स्पष्टपणे इशारा दिला की, ज्ञानेश कुमार यांनी ४८ तासांच्या आत राजीनामा दिला नाही, तर कॉकरोच जनता पक्ष देशभर उग्र आंदोलन उभारेल. राजीनामा न दिल्यास पक्ष गप्प बसणार नाही, असंही त्यांनी बजावलं.
"ज्ञानेश कुमार हे या देशाचे सर्वात मोठे गद्दार आहेत, सर्वात मोठे राष्ट्रद्रोही आहेत. त्यांनी एसआयआरच्या माध्यमातून देशातील १३ कोटींहून जास्त मतदारांची नावं वगळली आहेत," असा गंभीर आरोप दिपके यांनी केला. ज्ञानेश कुमार निवडणूक आयुक्त झाल्यापासून वेगवेगळ्या राज्यांमधल्या १३ कोटींहून अधिक मतदारांची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत, असंही ते म्हणाले.
भाजपची सत्ता कधीच जाऊ नये म्हणून ज्ञानेश कुमार जाणूनबुजून मतदारांची नावं वगळत आहेत का, असा थेट सवाल दिपके यांनी उपस्थित केला. हे सगळं करण्याची नेमकी काय गरज होती, असंही त्यांनी विचारलं.
याच पत्रकार परिषदेत सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही भाष्य केलं. देश वाचवण्यासाठी देशातल्या जनरेशन-झेड आणि तरुणांनी पुढे यावं, असं आवाहन त्यांनी केलं. स्वातंत्र्यापासूनच या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क आहे, याची त्यांनी आठवण करून दिली. देशातली ९० टक्क्यांहून जास्त लोकसंख्या गरीब असतानाही बाबासाहेब आणि पंडित नेहरू यांनी प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क मिळावा, अशी भूमिका घेतली होती, असं रांका यांनी सांगितलं.
रांका पुढे म्हणाले की, आपल्या देशात लोकशाही म्हणजे लोकांनी सरकार निवडणं, असा अर्थ होता. पण ज्ञानेश कुमार मुख्य निवडणूक आयुक्त झाल्यापासून कोणाला मतदानाचा हक्क द्यायचा आणि कोणाला नाही, हे सरकारच ठरवतंय, अशी टीका त्यांनी केली. ही कसली लोकशाहीची व्याख्या आहे, लोकशाहीची मूळ संकल्पनाच उलटीपालटी करून टाकली आहे, असा आरोप त्यांनी केला.