पारगाव-खंडाळ्यात तीन ट्रकमधले १०५ टन अमोनियम नायट्रेट पोलिसांनी पकडले, चालकांवर गुन्हा
रात्रगस्तीवरील पोलिसांना बसस्थानकाजवळ उभे असलेले ट्रक दिसले आणि स्फोटक अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा उघडकीस आला. तीन चालक आणि कंपनीच्या वाहतूक अधिकाऱ्यांवर खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.
खंडाळा तालुक्यातील पारगाव-खंडाळा येथे स्फोटक पदार्थ असलेल्या अमोनियम नायट्रेटचा तब्बल १०५ टन साठा तीन मालट्रकमधून नेला जात असताना पोलिसांनी पकडला. सुरक्षिततेचे नियम पाळले नसल्याचा ठपका ठेवून तीन ट्रकचालक आणि पनवेल, तळोजा येथील फर्टिलायझर कंपनीचे वाहतूक अधिकारी यांच्याविरुद्ध खंडाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
खंडाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी रात्रगस्तीवर होते. त्यांना पारगाव-खंडाळा येथील एसटी बसस्थानकाजवळ काही मालट्रक उभे असलेले दिसले. हे ट्रक तळोजा (पनवेल) येथील दिपक फर्टिलायझर येथून निघाले होते. तेलंगणा राज्यात हैदराबादमार्गे नलगोंडाजवळील चित्याल येथे ते जाणार होते. त्यांच्या क्रमांकांची नोंद अशी आहे: टिएस-०२-युडी-३१७०, टिएस-०२-युडी-३१७७ आणि टिएस-०२-३१७२. या तिन्ही ट्रकमध्ये मिळून १०५ टन अमोनियम नायट्रेट होते आणि त्याची वाहतूक सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करून सुरू होती, असे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गस्तीवरील कर्मचाऱ्यांनी लगेच ही माहिती खंडाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना दिली. जगताप यांनी वेळ न घालवता पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी ट्रकचालकांची नावे नोंदवली आहेत. रुपेशकुमार परमेश्वर तांती (वय ४६, रा. सरकपुर, तालुका बलदोर, जि. खागरिया, बिहार), अजकुमार अशोक प्रसाद (वय ३६, रा. गोपालवाडा, जिल्हा मध्यपुरा, बिहार) आणि फुलचंद झालु पासवान (वय ४६, रा. महेशकुट, तालुका गोगरी, जिल्हा खगडिया, बिहार) अशी ती नावे आहेत. या तिघांविरुद्ध, तसेच दिपक फर्टिलायझर कंपनीच्या वाहतूक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अमोनियम नायट्रेट हा स्फोटक पदार्थ आहे हे माहीत असतानाही त्यांनी वाहतूक परवान्याचे आणि सुरक्षिततेचे नियम मोडले, असा आरोप या गुन्ह्यात आहे.
पोलिसांनी तीन मालट्रकसह १०५ टन अमोनियम नायट्रेट जप्त केले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ट्रक ताब्यात घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शासनाच्या सुरक्षा विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले आणि त्यांनी पाहणी केली. सातारा येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव आणि त्यांच्याबरोबरचे अधिकारी व कर्मचारी यांनीही जागेला भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणाची फिर्याद पोलीस अंमलदार सुरज पवार यांनी खंडाळा पोलीस स्टेशनला दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल माने करत आहेत. खंडाळा पोलिसांनी वेळेवर दाखवलेल्या तत्परतेमुळे पुढचा मोठा अनर्थ टळला, असे या घटनेबाबत म्हटले जात आहे.