एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर ड्रोनने रेकी झाल्याची तक्रार, रखवालदाराने मोबाइलमध्ये केले रेकॉर्डिंग
मुक्ताईनगर येथील 'खडसे फार्म'वर रात्री अज्ञात व्यक्तीने ड्रोनने चित्रीकरण केल्याचे समोर आले असून, आमदार खडसे यांनी जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांकडे पत्राने तक्रार करून उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील 'खडसे फार्म'वर रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने ड्रोनच्या मदतीने संशयास्पद चित्रीकरण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याची तीव्र शंका व्यक्त करून खडसे यांनी जळगावच्या पोलीस उपअधीक्षकांकडे पत्राने तक्रार केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी या तक्रारीत केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळ मलकापूर रोडवर असलेल्या खडसे फार्महाऊसवर २८ सप्टेंबरला रात्री ७.५० ते ८.१५ च्या दरम्यान अचानक एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला. त्या ड्रोनमधून फार्महाऊसच्या परिसराचे चित्रीकरण केले जात होते. त्या वेळी आमदार खडसे मुंबई दौऱ्यावर होते, म्हणजे ते स्वतः फार्महाऊसवर नव्हते.
फार्महाऊसवर काम करणारे रखवालदार सचिन मराठे यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी प्रसंगावधान राखून आपल्या मोबाइलमध्ये या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि ते पुरावा म्हणून जपून ठेवले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पत्राची प्रत पोलीस मुख्यालयातील उपअधीक्षकांसह मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांनाही पाठवण्यात आली आहे. फार्महाऊसवर ड्रोनने रेकी करणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्यावा, संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेबद्दल बोलताना आमदार खडसे यांनी आपल्या सुरक्षेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. रात्रीच्या वेळी विनापरवाना ड्रोन उडवून रेकी करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे ते म्हणाले. यापूर्वीही आपली कोणतीही परवानगी न घेता सलग ६२ दिवस आपले मोबाईल फोन बेकायदेशीरपणे टॅप करण्यात आले होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याबद्दल त्यांनी मुंबईतील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
आता पुन्हा असा प्रकार घडत असल्याने आपल्याविरोधात कुठेतरी मोठे षडयंत्र रचले जात असावे, असा आरोप आमदार खडसे यांनी केला आहे.