पतीविरोधात तक्रार द्यायला गेलेल्या कल्याणच्या महिलेवरच गुन्हा, चार वर्षांनी डीएनए अहवालात मृतदेह पतीचा
कल्याणमधील नम्रता (नाव बदललेले) यांच्यावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या डीएनए अहवालात खाडीत सापडलेला मृतदेह त्यांच्या पतीचा नसल्याचे नमूद आहे.
कल्याणमधील एका महिलेवर ओढवलेल्या प्रसंगाची चर्चा सध्या सुरू आहे. पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये गेलेल्या या महिलेवरच पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक झाली. आता चार वर्षांनंतर माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या डीएनए अहवालात खाडीत सापडलेला मृतदेह त्यांच्या पतीचा नव्हता, असे नमूद आहे. या महिलेचे नाव नम्रता (नाव बदललेले) असे आहे.
हे सगळे सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू झाले. कल्याण येथील नम्रता पतीविरोधात तक्रार द्यायला नवघर पोलीस स्टेशनमध्ये गेल्या होत्या. तिथे पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही, उलट त्यांच्याशी वाद घातला. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मारहाणही केली, असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी नम्रता यांनी पती घर सोडून गेल्याची तक्रार दिली. पण त्यानंतरच्या घडामोडी चक्रावून टाकणाऱ्या होत्या. पोलिसांच्या दाव्यानुसार तक्रारीच्या दुसऱ्याच दिवशी खाडीत एका पुरुषाचा मृतदेह सापडला. तो मृतदेह नम्रता यांना दाखवला गेला नाही. पतीच्या भावानेच तो आपल्या भावाचा असल्याचे सांगून ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी नम्रता यांच्यावर पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
खाडीतला मृतदेह माझ्या पतीचा नाही, तो जिवंत आहे आणि अनेकांनी त्याला पाहिले आहे, असे नम्रता वारंवार सांगत होत्या. मात्र पोलिसांनी आणि सासरच्या लोकांनी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांना मानसिकदृष्ट्या आजारी ठरवून थेट मनोरुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पतीच्या भावाचे आणि मुलाचे डीएनए नमुने घेतले गेले होते, पण त्याचा अहवाल नम्रता यांच्यापासून लपवून ठेवण्यात आला, असे सांगितले जाते.
मनोरुग्णालयातून परत आल्यावर नम्रता यांनी डीएनए अहवाल मिळावा म्हणून सतत मागणी केली. प्रशासन अहवाल द्यायला टाळाटाळ करत होते, म्हणून त्यांनी माहितीच्या अधिकाराचा (RTI) वापर केला. तब्बल चार वर्षांनी हा अहवाल त्यांच्या हातात आला. त्यात खाडीत सापडलेला मृतदेह नम्रता यांच्या पतीचा नव्हता, असे स्पष्ट नमूद आहे.
या अहवालामुळे नम्रता यांचे म्हणणे खरे ठरल्याचे त्यांच्या बाजूने सांगितले जात आहे. पतीने पोलिसांच्या मदतीने हा संपूर्ण कट रचल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. फरार असलेला पती, त्याचा भाऊ, वहिनी आणि या कटात साथ देणारे पोलीस यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कमेंट
अजून कमेंट नाही. पहिली तुम्ही लिहा.