कॅरम स्पर्धा : राज्य मानांकन स्पर्धेत सोनाली कुमारी आणि महम्मद घुफ्रान सारस्वत चषकाचे मानकरी
मुंबईत झालेल्या पहिल्या सारस्वत ब्राम्हण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत महम्मद घुफ्रानने, तर महिला एकेरीत सोनाली कुमारीने विजेतेपद मिळवले.
सारस्वत ब्राम्हण समाज, मुंबई यांच्यातर्फे मुंबईत झालेल्या पहिल्या सारस्वत ब्राम्हण समाज राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद महम्मद घुफ्रानने मिळवले. ही स्पर्धा महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने झाली. स्पर्धेचे आयोजन सारस्वत ब्राम्हण समाजाने केले होते.
पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात घुफ्रानने प्रशांत मोरेला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २४-११, १०-२५ आणि २४-१७ असे हरवले. या विजयानंतर त्याला सारस्वत चषक आणि रोख 25000 रुपयांचे इनाम मिळाले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या निलांश चिपळूणकरने बाजी मारली. त्याने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर तीन सेटनंतर २५-२३, ९-१२ आणि २१-२१ असा निसटता विजय मिळवला.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या सोनाली कुमारीने आपल्या नेत्रदीपक खेळाने सर्वांची मने जिंकली. तीन सेटपर्यंत चाललेल्या लढतीत तिने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणला ९-२५, २५-१७ आणि १९-१७ असे हरवले. या विजयाने तिला या गटाचे विजेतेपद, 10000 रुपये आणि सारस्वत चषक मिळाला.
महिलांच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या अंजली सिरीपुरमने मुंबईच्याच मिताली पाठकवर तीन सेटमध्ये २१-२४, २४-१४ आणि २५-१० अशी मात केली.
त्याआधी उपांत्य फेरीच्या सामन्यांत प्रशांत मोरेने निलांश चिपळूणकरचा २१-८, ६-२५, २५-१० असा पराभव केला होता. महम्मद घुफ्रानने अभिजित त्रिपनकरचा २५-१७, २४-१७ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती. महिलांमध्ये केशर निर्गुणने मिताली पाठकचा २-१८, २५-१४, २५-४ असा, तर सोनाली कुमारीने अंजली सिरीपुरमचा २५-११, २५-१३ असा पराभव करून आगेकूच केली होती.
बक्षीस वितरणात सारस्वत बँकेचे माजी अध्यक्ष किशोर रांगणेकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षिसे, सारस्वत चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, सारस्वत ब्राम्हण समाजाचे मुख्य सचिव राजेंद्र देसाई, उपाध्यक्ष सुभाष कामत आणि कार्यकारिणी सदस्य रवींद्रनाथ भांगले आदी मान्यवर हजर होते.
मुख्य सचिव राजेंद्र देसाई यांनी स्पर्धेच्या नीटनेटक्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. ही स्पर्धा दरवर्षी भरवण्याची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली.