निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचे शिवाजी पार्कवर 2 ऑक्टोबरला जेल भरो आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलनाची घोषणा केली आहे, तर पोलिसांनी मात्र परवानगी नाकारली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित वाद देशभर गाजत असताना, त्यांच्या विरोधात आता कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) पण मैदानात उतरली आहे. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला नाही, तर 2 ऑक्टोबरपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा सीजेपीने दिला आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारताच सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक्सवर पोस्ट टाकत जेल भरो आंदोलनाची थेट घोषणा केली. "ज्ञानू, मस्ट गो..." अशी पोस्ट त्यांनी लिहिली. त्याखाली त्यांनी "जेल भरो आंदोलन 2 ऑक्टोबर, दुपारी 4 वाजता, शिवाजी पार्क" असंही स्पष्टपणे नमूद केलं. या पोस्टमुळे आणि आंदोलनाच्या घोषणेमुळे ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच पोस्टमध्ये दिपके यांनी सेव्ह डेमोक्रॅसी हा हॅशटॅगही वापरला. फक्त दोन ओळींच्या या पोस्टने ज्ञानेश कुमार यांच्यासोबतच मुंबई पोलिसांनाही सतर्क केलं आहे, असं दिसतं आहे. पोलिसांची परवानगी नाकारण्याची भूमिका असूनही सीजेपी आंदोलनावर ठाम असल्याचं यातून समोर येतं.
सीजेपीच्या या घोषणेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावरही दबाव वाढू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार 2 ऑक्टोबरपूर्वी राजीनामा देणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
दुसरीकडे, मुंबईत ठाकरे बंधूंकडूनही एक महामोर्चा काढण्यात येणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर रोजी मुंबईत हा महामोर्चा काढण्याचा निर्णय घेतला असून, या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतर पक्षांच्या नेत्यांनीही या महामोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मोर्चाची सुरुवात नेमकी कुठून होणार, तो कुठपर्यंत जाणार आणि किती वाजता निघणार, याबद्दलची सविस्तर माहिती राज ठाकरे लवकरच जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
एकीकडे सीजेपीकडून जेल भरो आंदोलनाची घोषणा आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंकडून महामोर्चाची तयारी, यामुळे मुंबईतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही आंदोलनांना पुढील काळात कसा प्रतिसाद मिळतो आणि त्यातून कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.