Food Recipe: कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा चवदार अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला येईल भन्नाट चव
डब्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत रोज काय भाजी करावी हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, त्यासाठी झटपट होणारी अमृतसरी पनीर भुर्जी हा एक टेस्टी ऑप्शन आहे.
सकाळच्या डब्यापासून ते अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत रोज नक्की कोणती भाजी करावी हा प्रश्न जवळपास सगळ्यांनाच पडतो. अशा वेळी गरम चपातीसोबत खायला अमृतसरी पनीर भुर्जी हा एक झटपट आणि टेस्टी ऑप्शन आहे. हा पदार्थ कमी साहित्यात आणि कमी वेळात तयार होतो आणि चवीलाही एकदम मस्त लागतो. पनीर भुर्जी आणि गरमागरम चपाती हे कॉम्बिनेशन खायला अतिशय भन्नाट लागतं.
ही भुर्जी करायला घरात असणारं साहित्य पुरेसं आहे. यासाठी पनीर, टोमॅटो, कांदा, लाल तिखट, हळद, बेसन, कसुरी मेथी, चाट मसाला, पावभाजी मसाला, काळीमिरी पावडर, जिरं पावडर, कोथिंबीर, तेल, हिरवी मिरची, बटर आणि दही एवढं साहित्य लागतं.
ही भुर्जी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे. सुरुवातीला एका वाटीत दही घेऊन ते नीट फेटून घ्यायचं, दह्यात अजिबात गुठळ्या राहायला नकोत याची काळजी घ्यायची. त्यानंतर एका कढईत कसुरी मेथी आणि बेसन वेगवेगळं भाजून घ्यायचं. हे दोन्ही पदार्थ भाजल्यामुळे तयार होणाऱ्या भुर्जीला चांगला सुगंध येतो. हे भाजून झाल्यावर त्याच कढईत पुन्हा एकदा तेल गरम करायला ठेवायचं.
हे तेल गरम झाल्यावर त्यात हळद, लाल तिखट, आधी भाजून ठेवलेलं बेसन, कसुरी मेथी, काळीमिरी पावडर, जिरं पावडर, चाट मसाला, पावभाजी मसाला आणि सुरुवातीला फेटून ठेवलेलं दही घालून हे सगळे जिन्नस नीट मिक्स करायचे. हे मिश्रण जर जास्त घट्ट वाटलं तर त्यात गरजेनुसार थोडं पाणी घालायचं, म्हणजे ग्रेव्ही तयार होते.
दुसऱ्या बाजूला आणखी एका कढईत तेल आणि बटर एकत्र गरम करून घ्यायचं. त्यात हिरवी मिरची, जिरं आणि ठेचून घेतलेला लसूण घालून हे मिश्रण लालसर होईपर्यंत भाजायचं. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घालून हे सगळं शिजवायचं.
कांदा आणि टोमॅटो नीट शिजल्यावर त्यात आधी तयार करून ठेवलेली ग्रेव्ही ओतायची आणि मंद आचेवर तेल वेगळं होईपर्यंत हे मिश्रण परतायचं. ग्रेव्ही चांगली शिजण्यासाठी त्यात थोडं पाणी घालून मंद आचेवरच शिजवून घ्यायचं. ग्रेव्ही व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात बारीक केलेलं पनीर घालायचं आणि गॅस मंद ठेवूनच सगळं व्यवस्थित मिक्स करायचं.
शेवटी ही भुर्जी पूर्ण शिजल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करायची. अशाप्रकारे कमीत कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार झालेली ही अमृतसरी पनीर भुर्जी घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल.