जावळीत सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अटळ; रांजणे यांच्याविरुद्ध शिंदे की गोळे, अजून ठरले नाही
सातारा जिल्हा बँकेच्या जावळी सोसायटी मतदारसंघात निवडणूक होणार असे मानले जात आहे. २१ ऑक्टोबर ही अर्ज माघारीची अंतिम तारीख आहे.
छायाचित्रे सत्यापित केलेली नाहीत
मेढा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अटळ मानली जात आहे. सोसायटीचे ठराव घेण्यापासूनच जावळीत मोठी चुरस निर्माण झाली होती आणि अनेक ठिकाणी वादंग पाहायला मिळाला, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी झाली आहे.
विद्यमान जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्याविरुद्ध नेमका कोण उभा राहणार, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे स्वतः लढणार की त्यांचे समर्थक विठ्ठल गोळे उमेदवार असतील, हे ठरलेले नाही. मात्र जवळपास गोळे हेच उमेदवार राहतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
जिल्हा बँक निवडणुकीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून २१ ऑक्टोबर ही अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. तालुक्यात निवडणूक होणार की बिनविरोध, याची चर्चा सुरू असताना लोकांना ठराव प्रक्रियेचे दिवस आठवत आहेत. त्या वेळी आखाडे येथे झालेला राडा आजही तालुक्यातील नागरिकांच्या अंगावर काटा आणतो. शिंदे यांच्या होम पिचवरच मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना मोठा दणका दिला होता. हे सर्व पाहता शशिकांत शिंदे ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाहीत, असे त्यांच्या गटाकडून बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे स्वतः की विठ्ठल गोळे, हे अर्ज माघारीपर्यंत ठरणार आहे.
जावळीतील एकूण ४८ मतदारांपैकी ३८ मतदारांना १० ऑगस्टपासून सहलीवर नेण्यात आले आहे. ज्ञानदेव रांजणे यांनी सुरक्षितता म्हणून ही खबरदारी घेतली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून कुटुंबापासून दूर राहिलेल्या या मतदारांनी अद्याप आपल्या घरच्यांचे तोंड देखील पाहिलेले नाही. आता एक नोव्हेंबरपर्यंत तरी त्यांना कुटुंबापासून दूरच राहावे लागणार आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत रांजणे यांनी २८ मतदार सहलीवर नेले होते. तरीही त्यांना एका मताने निसटता विजय मिळाला होता. त्यामुळे यावेळी तीन महिने अगोदरपासूनच रांजणे अलर्ट मोडमध्ये दिसले आणि यंदा तब्बल ३८ मतदार सहलीवर नेले गेले. शशिकांत शिंदे उमेदवार असतील तर दोन ते तीन मते इकडे तिकडे होऊ शकतात. पण विठ्ठल गोळे उमेदवार असतील तर रांजणे ३८ पेक्षा अधिक मते घेऊ शकतात. त्यामुळे रांजणे यांना हा सामना सोपा ठरणार आहे.
दुसरीकडे, महायुतीचा जिल्हा पातळीवरील दहा जागांचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा झाला आहे. भाजप, सेना आणि राष्ट्रवादी या तिघांना समान जागा हव्या आहेत. अशा परिस्थितीत जावळी तालुक्यात उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. त्यामुळे अर्ज माघारीपर्यंत जावळीला दुसरा उमेदवार मिळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.