जमुई विनयभंग प्रकरण: पोलिसांच्या कथित चकमकीत दोन आरोपी जखमी, अधिकृत दुजोरा नाही
बिहारमधील जमुई जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या शोधमोहिमेत दोन मुख्य आरोपी कथित चकमकीत जखमी झाले.
बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या प्रकरणावरून बिहार सरकार आणि पोलिसांवर देशभरातून टीका होत होती. आता या प्रकरणात पोलिसांच्या कारवाईदरम्यान झालेल्या कथित चकमकीत दोन मुख्य आरोपी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. नंदन यादव आणि हरेराम यादव अशी या दोन आरोपींची नावं असून दोघेही सज्ञान आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विनयभंगाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बिहार पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तातडीने मोहीम सुरू केली. आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांशी चकमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात नंदन यादवच्या पायाला गोळी लागली, तर हरेराम यादवचा पाय मोडला असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या संपूर्ण चकमकीबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. चकमकीनंतर दोन्ही जखमी आरोपींना जमुई सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात नेत असल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
जमुईमध्ये चार-पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत, दहावीत शिकणारा एक अल्पवयीन मुलगा आणि एक अल्पवयीन मुलगी सायंकाळी क्लासवरून परत येत असताना काही जणांच्या घोळक्याने त्या दोघांना अडवलं. या घोळक्याने पीडित मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करत तिचा विनयभंग केला, अशी घटना आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार सरकारवर देशभरातून टीकेची झोड उठली, त्यानंतर पोलीस प्रशासनाने आरोपींविरोधात मोठी आणि आक्रमक मोहीम सुरू केली.
आरोपींना पकडण्यासाठी जिल्ह्यातील विविध संभाव्य लपण्याच्या ठिकाणी कसून छापे टाकण्यात आले. याच छाप्यांदरम्यान पोलीस आणि आरोपींमध्ये कथित चकमक झाल्याचं वृत्त आहे. नंदन यादवला पकडण्यासाठी कुंदर बॅरेकजवळ ही चकमक झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करताना नंदनच्या पायाला गोळी लागली, तर पळून जाताना हरेरामचा पाय मोडला, असं सांगितलं जातं.
दोन्ही आरोपी प्रतापपूर गावचे रहिवासी असून व्यवसायाने ट्रॅक्टर चालक आहेत. या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून एसआयटी उर्वरित एका आरोपीचा शोध घेत आहे. जखमी दोघांना पोलीस कोठडीत जमुई सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून रुग्णालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजता मडवा पहाडजवळ स्कूटरवरून जाणाऱ्या अल्पवयीन मुलाला आणि मुलीला समाजकंटकांच्या एका गटाने जबरदस्तीने थांबवलं, त्यांच्याशी गैरवर्तन केलं आणि मारहाण केली, अशी घटना घडली होती. त्यानंतर आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ स्वतःच इंटरनेटवर व्हायरल केला होता.