मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026

आत्ताच सबस्क्राइब करा
प्राइम अलर्ट
सर्व थेट अपडेट
18:20 IST

'ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे' जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

बिहारच्या जमुई जिल्ह्यात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला अडवून झालेल्या छेडछाडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त केला असून राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.

बिहारच्या जमुई जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुण आणि तरुणीला रस्त्यात अडवून त्यांच्याशी असभ्य वर्तन आणि छेडछाड केल्याचा हा प्रकार आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावरून सगळीकडे संताप व्यक्त केला जातोय.

या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार प्रतिक्रिया दिली. हा व्हिडिओ मनाला चटका लावणारा आणि तितकाच संतापजनक असल्याचं त्यांनी म्हटलं. अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या या कथित गैरवर्तनाचा त्यांनी स्पष्ट शब्दांत निषेध केला.

याच पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्रातल्या एका जुन्या घटनेचाही उल्लेख केला. सिंहगडावर फिरायला आलेल्या आठ वर्षांच्या एका मुलीने बरम्युडा घातला होता, या कारणावरून काही जणांनी तिच्या वडिलांसोबत भांडण करत मारहाण केली होती, याची आठवण त्यांनी करून दिली. या दोन्ही घटना एकत्र मांडत त्यांनी तथाकथित 'संस्कृती रक्षकां'च्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. महाराष्ट्रातील सिंहगडावरची ही घटना आणि आता बिहारमधील जमुईतील घटना, या दोन्हींमध्ये एकाच प्रकारची मनोवृत्ती दिसून येत असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

"ही अंधभक्तांची जमात आहे, ही जमात फोफावत चालली आहे, यांना कोण प्रोत्साहन देतंय? यांना कायद्याची भीतीच राहिली नाही का?" असा थेट सवाल रोहिणी खडसे यांनी विचारला. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कडक कारवाई करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. समाजात अशा प्रकारच्या घटनांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर हे प्रकार वाढतच जातील, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.

दुसरीकडे, जमुईतील या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानेही स्वतःहून दखल घेतली आहे. अल्पवयीन मुलीची छेड काढणे, तिला जबरदस्तीने अडवणे, मारहाण आणि विनयभंगाचे आरोप लक्षात घेत आयोगाने बिहारच्या पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. व्हिडिओतील फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करावी आणि ठराविक वेळेत निष्पक्ष चौकशी पूर्ण करावी, असे निर्देश आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं समजतं.

याबाबत जमुईचे पोलीस अधीक्षक विश्वजीत दयाल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार, 19 सप्टेंबरला संध्याकाळी साधारण सातच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हिडिओत सहा ते सात जण दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. काही संशयितांची ओळख पोलिसांनी पटवली असून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अजून अपडेट नाहीत

ही बातमी प्रकाशित झाली आहे पण थेट मालिका सुरू झालेली नाही. डेस्कने अपडेट दाखल करताच तो इथे दिसेल.

ही भेट आम्ही मोजू का? कोणत्या बातम्या कशावर वाचल्या जातात हे पाहण्यासाठी PT24 Google Analytics वापरते. तुम्ही हो म्हणेपर्यंत ते बंद आहे, तुम्ही ठरवत असताना काहीही मोजले जात नाही, आणि तुम्ही You वर कधीही मन बदलू शकता. आम्ही काय घेऊ